माझी आमदारकी भाजपच्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांना समर्पित   – आमदार प्रमोद जठार

कोकणचा विकास आणि रोजगारालाच प्राधान्य

सावंतवाडी भाजप कार्यालयात पदाधिकाऱ्यांकडून जंगी स्वागत 

सावंतवाडी । प्रतिनिधी : माझी आमदारकी ही भारतीय जनता पार्टीच्या नव्या आणि जुन्या कार्यकर्त्यांच्या कष्टाला समर्पित असून, पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांच्या आशीर्वादाने आगामी काळात जनहितार्थ काम करणार आहे. पुढची सहा वर्षे शतप्रतिशत भाजपचा विचार तळागाळापर्यंत पोहोचवत कोकणच्या विकासाला माझे सर्वोच्च प्राधान्य असेल. कोकणच्या विकासात जो काही बॅकलॉग शिल्लक राहिला आहे, तो सरकारचा दुवा बनून पूर्णपणे भरून काढेन, असा ठाम विश्वास भाजपचे विधानपरिषदेचे नवनिर्वाचित आमदार प्रमोद जठार यांनी व्यक्त केला. आमदार पदी निवड झाल्यानंतर सावंतवाडी येथील भाजप मध्यवर्ती कार्यालयात आयोजित जंगी स्वागत सोहळ्यात ते बोलत होते.

येथील भाजप कार्यालयात आगमन होताच सावंतवाडीतील भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या वतीने आमदार जठार यांचे उत्साहात स्वागत करण्यात आले. यावेळी त्यांना हार आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचे अभिनंदन करण्यात आले. या प्रसंगी उपस्थितांशी संवाद साधताना आमदार जठार म्हणाले की, देशामध्ये आज भाजपला जे मोठे यश मिळाले आहे, ते केवळ कार्यकर्त्यांच्या ताकदीमुळेच शक्य झाले असून हे पक्षाच्या शंभर वर्षांच्या त्यागाचे फळ आहे. मला मिळालेल्या या पदाचा उपयोग पक्षाची संघटनात्मक बांधणी अधिक मजबूत करण्यासाठी आणि जनतेचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी करण्याचा माझा मानस आहे. येणाऱ्या काळात मुख्यमंत्री, भाजप प्रदेशाध्यक्ष, खासदार, पालकमंत्री आणि जिल्हाध्यक्ष यांच्या मार्गदर्शनाखाली पालघर ते सिंधुदुर्ग या कोकण पट्ट्याचा समन्वयक म्हणून मी प्रभावीपणे काम करेन, अशी ग्वाही त्यांनी दिली.

यावेळी शहरात दोन ठिकाणी झालेल्या स्वागतावरून जठार यांना विचारले असता, त्यांनी स्पष्ट केले की,

आमच्यामध्ये कोणतेही गट-तट नाहीत. भाजप हाच आमचा एकमेव गट असून आम्ही सर्वजण ‘राष्ट्र प्रथम’ हा विचार जपणारे कार्यकर्ते आहोत. कोकणातील ज्वलंत प्रश्नांवर भाष्य करताना त्यांनी सांगितले की, इथल्या तरुण-तरुणींना रोजगारासाठी जिल्ह्याबाहेर जावे लागू नये, यासाठी आपला विशेष प्रयत्न राहील. येत्या काळात कोकणात रोजगाराच्या मोठ्या संधी उपलब्ध झालेल्या दिसतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. तसेच आगामी काळात अनेक जण भाजपमध्ये प्रवेश करून जयघोष करताना दिसतील, असा टोलाही त्यांनी विरोधकांना लगावला.

या स्वागत सोहळ्याला जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत, भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, महिला जिल्हाध्यक्ष श्वेता कोरगावकर, नगराध्यक्षा युवराज्ञी श्रद्धाराजे भोंसले, भाजप सरचिटणीस महेश सारंग, माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर, युवराज लखमराजे भोंसले, शहराध्यक्ष सुधीर आडीवरेकर, मनोज नाईक, आनंद नेवगी, प्रतीक बांदेकर, ॲड. परिमल नाईक, माजी उपनगराध्यक्षा अन्नपूर्णा कोरगावकर, रवी मडगावकर, नीलम नाईक, सुनीता पेडणेकर यांच्यासह भाजपचे विविध सेलचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.