आमदार प्रमोद जठार यांचा सावंतवाडीत वैश्य वाणी युवा संघटनेतर्फे गौरव

युवा संघटनेच्या कार्याचे जठार यांच्याकडून कौतुक

सावंतवाडी | प्रतिनिधी : येथील वैश्य वाणी युवा संघटनेच्या वतीने माजी आमदार प्रमोद जठार यांचे विशेष अभिनंदन करून त्यांचा गौरव करण्यात आला. सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातील त्यांच्या उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन संघटनेच्या वतीने या सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.

याप्रसंगी वैश्य वाणी युवा संघटनेचे अध्यक्ष अमित गवंढळकर यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने प्रमोद जठार यांची सदिच्छा भेट घेतली. यावेळी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे अभिनंदन करण्यात आले व पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या. या भेटीदरम्यान केवळ सत्कारच नव्हे, तर समाजाच्या प्रलंबित प्रश्नांवर आणि युवा संघटनेच्या आगामी सामाजिक उपक्रमांवरही सविस्तर चर्चा करण्यात आली.

समाजाच्या उन्नतीसाठी आणि युवकांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणाऱ्या नेतृत्वाचा सत्कार करणे हे आमचे कर्तव्य आहे. भविष्यातही जठार साहेबांचे मार्गदर्शन युवा संघटनेला लाभत राहील, अशी भावना यावेळी अध्यक्ष अमित गवंढळकर यांनी व्यक्त केली.

या सत्काराला उत्तर देताना प्रमोद जठार यांनी युवा संघटनेच्या या प्रेमाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. “तरुणांनी सामाजिक कार्यासाठी एकत्र येणे ही काळाची गरज आहे. वैश्य वाणी युवा संघटना राबवत असलेल्या उपक्रमांना माझे नेहमीच सहकार्य असेल,” असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.

या सोहळ्याला वैश्य वाणी युवा संघटनेचे प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यामध्ये अध्यक्ष अमित गवंढळकर यांच्यासह अरुण भिसे, प्रशांत वाळके, प्रतिक कोरगांवकर, मेहेर पडते, श्रीधर बोंद्रे, प्रसाद नार्वेकर, नंदू पोकळे, कपिल कोरगांवकर, नित्यानंद कोरगांवकर व अन्य सदस्यांचा समावेश होता.