‘पदे मिळवली म्हणजे पक्ष वाढत नाही, जनतेचे प्रश्न सोडवा’; आमदार प्रमोद जठार यांचा कार्यकर्त्यांना कानमंत्र

दोडामार्गात आ. प्रमोद जठार यांचे जल्लोषात स्वागत 

दोडामार्ग:सुहास देसाई

“भारतीय जनता पक्ष हा एक परिवार आहे. पक्ष संघटना बळकट करण्यासाठी सर्व हेवेदावे आणि भांडण-तंटे बाजूला ठेवून समन्वयाने काम करा. केवळ पदे मिळविली म्हणजे पक्ष वाढत नाही, तर जनतेच्या समस्या सोडवून त्यांचा विश्वास संपादन करा,” असे प्रतिपादन विधान परिषद आमदार प्रमोद जठार यांनी केले.

 

विधान परिषदेवर आमदार म्हणून निवड झाल्यानंतर प्रथमच दोडामार्ग दौऱ्यावर आलेल्या प्रमोद जठार यांचे पिंपळेश्वर चौक येथे जंगी स्वागत करण्यात आले. यावेळी भाजप संपर्क कार्यालयात आयोजित पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते.

 

आ. प्रमोद जठार बोलताना म्हणाले की, दोडामार्ग तालुक्याचा विकासाचा जो काही बॅकलॉग राहिला आहे, तो येत्या पाच वर्षांत पूर्ण करण्यासाठी आतापासूनच कामाला लागा. “आपण सत्ताधारी आहोत, त्यामुळे आपणच आंदोलने किंवा उपोषणे न करता समस्यांवर ठोस ‘सोल्युशन’ काढले पाहिजे. विशेषतः आरोग्य आणि रोजगाराच्या प्रश्नावर लक्ष केंद्रित करा. दोडामार्गच्या विकासाचा एक निश्चित ॲक्शन प्लॅन तयार करून तो वरिष्ठांकडे मांडा. जनतेला सुखी आणि समाधानी ठेवले, तरच लोक पुढील १५ वर्षे पक्षाशी एकनिष्ठ राहतील,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

तालुक्यातील भाजपा

पक्षवाढीसाठी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना त्यांनी अंतर्गत वादावर कडक शब्दांत बोट ठेवले. “पक्षात जुने-नवे असा भेदभाव चालणार नाही. ज्यांना पदे मिळाली नाहीत, त्यांना सन्मान द्या, त्यांचा सत्कार करा. प्रत्येक माणूस आपला आहे ही भावना ठेवून काम करा,” असे आवाहन त्यांनी केले.

 

यावेळी व्यासपीठावर भाजप जिल्हाअध्यक्ष प्रभाकर सावंत, जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत, महिला जिल्हाध्यक्ष श्वेता कोरगावकर, भाजपा तालुकाध्यक्ष दीपक गवस, पंचायत समिती सभापती पार्वती गवस, नगराध्यक्ष चेतन चव्हाण, माजी तालुकाध्यक्ष रंगनाथ गवस यांच्यासह सोनिया नाईक, पराशर सावंत, अंकुश नाईक, सिद्धेश पांगम, संध्या प्रसादी, जिल्हा परिषद सदस्या श्वेता धरणे, आकांक्षा शेटकर, दीक्षा महालकर, रुक्मिणी नाईक व इतर अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.