दोडामार्ग (सुहास देसाई )दोडामार्ग तालुक्यातील सर्वात मोठी असलेली साटेली भेडशी ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी भाजपाचे बूथ अध्यक्ष चंद्रकांत जयराम मयेकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.
मागील काही दिवसांपासून साटेली भेडशी ग्रामपंचायत विविध घडामोडींमुळे राजकीय चर्चेच्या केंद्रस्थानी आली होती. तत्कालीन उपसरपंच सुमन डिंगणेकर यांच्यावर सरपंच यांच्यासह आठ सदस्यांनी अविश्वास ठराव दाखल करून तो बहुमताने संमत केला होता. त्यानंतर या प्रक्रियेमध्ये नवा ट्विस्ट निर्माण झाला. अविश्वास ठराव मंजूर होण्यासाठी ग्रामसभेचा निर्णय आवश्यक असल्याने विशेष ग्रामसभा बोलावण्यात आली होती. या ग्रामसभेत ग्रामस्थांनीही सरपंच आणि आठ सदस्यांच्या भूमिकेला पाठिंबा देत अविश्वास ठरावाच्या बाजूने कौल दिला. परिणामी श्रीम. डिंगणेकर यांना उपसरपंच पदावरून पायउतार व्हावे लागले होते.
या नाट्यमय घडामोडींनंतर रिक्त झालेल्या उपसरपंच पदासाठी सोमवारी निवडणूक प्रक्रिया पार पडली. ही बैठक सरपंच छाया धर्णे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती. या वेळी उपसरपंच पदासाठी चंद्रकांत जयराम मयेकर यांचा एकमेव अर्ज आल्याने, त्यांची बिनविरोध निवड झाल्याचे अधिकृतपणे घोषित करण्यात आले.
या प्रसंगी सरपंच छाया धर्णे, ग्रामविकास अधिकारी ज्योती डोंगरदिवे, ग्रामपंचायत सदस्य गणपत डांगी, विष्णू सुतार, शोभना जुवेकर, सेजल धर्णे, संपदा गवस, दिपाली मोरजकर, निलपर्णा पार्सेकर तसेच ग्रामपंचायत कर्मचारी विनोद परमेकर आणि प्रवीण चौगुले उपस्थित होते.
निवड जाहीर झाल्यानंतर भाजपा जिल्हा चिटणीस सुधीर दळवी, शामसुंदर धर्णे, वैभव इनामदार, वैभव सुतार, संजय धर्णे, हृषीकेश धर्णे, सिद्धेश कासार, लक्ष्मण गवस, दत्ताराम धर्णे यांच्यासह स्थानिक ग्रामस्थ, व्यापारी वर्ग आणि मित्रपरिवाराने ग्रामपंचायत कार्यालयात उपस्थित राहून नवनिर्वाचित उपसरपंच चंद्रकांत मयेकर यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले.













