विश्वशांती व मनशांतीसाठी करण्यात आली प्रार्थना
अक्कलकोट : श्री स्वामी समर्थ प्रकटदिन ते पुण्यतिथी दरम्यान राज्यभरात समर्थ नगरी परिवाराच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या लिखित नामजप सोहळ्याचा समारोप अक्कलकोट येथे भक्तिमय वातावरणात पार पडला. सहभागी भक्तांनी पाठविलेल्या नामजप ग्रंथांची दिंडी मिरवणूक शहरातून काढण्यात आली. “ओम श्री स्वामी समर्थ” नामाच्या अखंड गजराने अवघे अक्कलकोट दुमदुमून गेले होते. यावेळी विश्वशांती व मनशांतीसाठी विशेष प्रार्थना करण्यात आली.
श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन महेश इंगळे तसेच स्वामीभक्त चोळप्पा महाराजांचे वंशज वे. शा. सं. अण्णू महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली समर्थ नगरी परिवाराचे संस्थापक अध्यक्ष सैदप्पा इंगळे यांच्या नियोजनातून राज्यभरात लिखित नामजप सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.
भक्तांनी पाठविलेल्या नामजप ग्रंथांचे बुधवारी सायंकाळी पाच वाजता श्री खंडोबा मंदिर येथे अखिल भाविक वारकरी मंडळाचे राष्ट्रीय अध्यक्ष सुधाकर महाराज इंगळे, संस्थापक अध्यक्ष सैदप्पा इंगळे, महिला राज्याध्यक्षा वनिताताई झेंडे ,वीणाताई कामठे, रामलिंग पाटील व सिमाताई जोशी यांच्या उपस्थितीत गुरव पुजाऱ्यांच्या हस्ते विधिवत पूजन करण्यात आले. त्यानंतर “ओम श्री स्वामी समर्थ” नामजप करत दिंडी पालखी मिरवणूक काढण्यात आली.
श्री स्वामी समर्थ समाधी मठ येथे वे. शा. सं. अण्णू महाराज यांच्या हस्ते नामजप ग्रंथांचे पूजन करून स्वामी चरणी सेवा अर्पण करण्यात आली. पुढे शहरातील मुख्य मार्गाने दिंडी श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान येथे पोहोचली. येथे मंदिर समितीचे चेअरमन महेश इंगळे व श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे कार्यकारी विश्वस्त अमोलराजे भोसले यांनी पालखीचे स्वागत करून नामजप ग्रंथ स्वामी चरणी अर्पण केले. भक्ताना महाप्रसादाचीसेवा श्री राजेराय मठाच्या वतिने करण्यात आली .
या सोहळ्यात अक्कलकोट, पुणे, मिरज, नळदुर्ग आदी भागांतील मोठ्या संख्येने स्वामीभक्त सहभागी झाले होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी गणेश पाठक, कुमार पतंगे, सुभाष तारापूरे, राहुल होटकर, सुखदा ग्रामोपाध्ये, कावेरी धरणे, अश्विनी शिंपी, सुवर्णा इंगळे, श्रीपाद इंगळे, प्रसाद इंगळे, अनघा इंगळे आदींनी परिश्रम घेतले.










