घरकाम करणाऱ्या मदतनीसावर अति विश्वास पडला महागात; IRS अधिकाऱ्यांच्या मुलीची हत्या, आरोपी नोकर अटकेत

घरातील माहितीच ठरली घातक
ऑनलाइन गेमिंगच्या व्यसनातून वाढले कर्ज, गुन्ह्याचा संशय

दिल्लीतील अमर कॉलनी परिसरात घडलेल्या धक्कादायक घटनेने सर्वत्र खळबळ उडाली आहे. एका IRS अधिकाऱ्यांच्या घरात पूर्वी काम करणाऱ्या नोकराने त्यांच्या 22 वर्षीय मुलीची हत्या केल्याचा आरोप आहे. घरातील सर्व हालचाली, चाव्यांची जागा आणि कुटुंबाची माहिती आरोपीला आधीपासून माहीत होती. पोलिसांच्या तपासात आरोपीला ऑनलाइन लुडोच्या व्यसनामुळे कर्जबाजारी झाल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणानंतर घरकामासाठी ठेवलेल्या व्यक्तींवर अति विश्वास ठेवताना काळजी घेण्याची गरज पुन्हा अधोरेखित झाली आहे.


दिल्ली : राजधानीतील अमर कॉलनी परिसरात घडलेल्या एका भीषण घटनेने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. एका IRS अधिकाऱ्यांच्या घरात पूर्वी काम करणाऱ्या नोकराने त्यांच्या 22 वर्षीय मुलीवर अत्याचार करून तिची हत्या केल्याचा आरोप समोर आला आहे. आरोपीने घरातील रोकड घेऊन घटनास्थळावरून पलायन केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी राहुल हा जवळपास वर्षभर त्या अधिकाऱ्यांच्या घरी काम करत होता. त्यामुळे घरातील सर्व हालचाली, चाव्या कुठे ठेवतात, कुटुंबातील सदस्य कधी बाहेर जातात आणि घरात कोणत्या मौल्यवान वस्तू आहेत याची त्याला संपूर्ण माहिती होती. काही महिन्यांपूर्वी गैरवर्तन आणि आर्थिक अफरातफरीच्या आरोपांमुळे त्याला कामावरून काढण्यात आले होते.

मात्र, कामावरून कमी केल्यानंतरही घरातील सुरक्षा व्यवस्थेत कोणताही बदल करण्यात आला नाही. आरोपीला घराच्या चाव्यांची जागा माहीत असल्याने त्याने संधी साधून घरात प्रवेश केला. त्या वेळी अधिकाऱ्यांची मुलगी घरात एकटी असल्याचे सांगितले जात आहे. आरोपीने तिच्यावर अत्याचार करून नंतर गळा आवळून हत्या केली, असा आरोप पोलिस तपासात समोर आला आहे.

घटनेनंतर आरोपीने घरातील सुमारे अडीच लाख रुपये घेऊन पलायन केल्याची माहिती आहे. पोलिसांनी तातडीने तपास सुरू करून आरोपी राहुलला अटक केली. न्यायालयाने त्याला चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणातील इतर पैलूंचाही सखोल तपास सुरू असल्याचे दिल्ली पोलिसांनी सांगितले.

तपासादरम्यान आरोपीला ऑनलाइन लुडो गेमचे व्यसन असल्याची माहिती समोर आली आहे. या व्यसनामुळे त्याच्यावर मोठे कर्ज झाले होते. आर्थिक अडचणी आणि वाढत्या दबावामुळे त्याने हा गंभीर गुन्हा केल्याचा संशय पोलिस व्यक्त करत आहेत.

या प्रकरणात आणखी एक धक्कादायक बाब म्हणजे आरोपीची ओळख पीडित कुटुंबाशी जुन्या संबंधातून झाली होती. राहुलच्या वडिलांचे कार्यालयीन संबंध असल्याने त्याला घरात कामावर ठेवण्यात आले होते. मात्र, विश्वासाचा गैरफायदा घेत त्याने हे कृत्य केल्याचा आरोप आहे.

या घटनेनंतर घरात कामासाठी ठेवलेल्या व्यक्तींविषयी सतर्क राहणे, त्यांची पार्श्वभूमी तपासणे आणि सुरक्षा व्यवस्थेत वेळोवेळी बदल करणे किती महत्त्वाचे आहे, याची पुन्हा जाणीव झाली आहे.

DelhiCrime, IRSOfficer, AmarColony, CrimeNews, DelhiPolice, OnlineLudo, MurderCase, HouseHelp, BreakingNews, PraharDigital, MaharashtraNews, RatnagiriNews, SindhudurgNews, CrimeAlert, IndiaNew