रत्नागिरी:
रत्नागिरी जिल्ह्यामध्ये येत्या ९ मे पर्यंत काही ठिकाणी दुपारी किंवा संध्याकाळी विजांच्या कडकडाटासह हलका पाऊस पडण्याची शक्यता प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई यांनी वर्तवली आहे. १० ते १२ मे या कालावधीत हवामान कोरडे राहण्याचा अंदाज असून कमाल तापमानात १० मे पर्यंत हळूहळू वाढ होईल, तर त्यानंतर त्यात किंचित घट होऊ शकते. या पार्श्वभूमीवर डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी विशेष कृषी सल्ला जाहीर केला आहे.
आंबा आणि काजू बागायतदारांनी घ्यावी विशेष काळजी
जिल्ह्यात पावसाची शक्यता असल्याने काढणीस तयार झालेल्या हापूस आंब्याची लवकरात लवकर काढणी करून फळे सुरक्षित ठिकाणी हलवण्याचे आवाहन करण्यात आले आहे. काढणी करताना ती सकाळी १० वाजेपूर्वी किंवा संध्याकाळी ४ नंतर ‘नूतन’ झेल्याच्या साहाय्याने ८० ते ८५ टक्के पक्वतेची करावी, ज्यामुळे फळांमधील साक्याचे प्रमाण कमी राहण्यास मदत होते. काढणीनंतर फळकूज रोगाच्या नियंत्रणासाठी ५० अंश सेल्सिअस तापमानाच्या उष्णजलात पोटॅशियम मेटाबायसल्फाईटचे द्रावण मिसळून त्यात १० मिनिटे प्रक्रिया करावी. तसेच, मोकळ्या जागेत वाळवण्यासाठी ठेवलेल्या काजू बियांचे पावसापासून संरक्षण करण्यासाठी त्या सुरक्षित आणि झाकलेल्या ठिकाणी ठेवाव्यात.
खरीप पूर्व मशागतीला वेग
आगामी खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांनी जमिनीची नांगरट करून जमीन १५ ते २० दिवस उन्हात तापू द्यावी, ज्यामुळे जमिनीतील कीड आणि रोगकारक बुरशींचा नाश होतो. भात लागवडीसाठी विद्यापीठाने रत्नागिरी-१, रत्नागिरी-२४, कर्जत-३ यांसारख्या विविध सुधारित जातींची शिफारस केली असून, बियाण्यांच्या उपलब्धतेसाठी शिरगाव किंवा वाकवली येथील संशोधन केंद्रांशी संपर्क साधण्याचे सुचवले आहे. तसेच हळद लागवडीसाठी मे महिना हा योग्य काळ असून सरी-वरंबा पद्धतीने लागवड करण्यापूर्वी जमिनीची खोल नांगरट करून प्रति गुंठा २५ किलो बियाण्यांचा वापर करावा.
पशुधन आणि नवीन फळबागांचे व्यवस्थापन
वाढत्या उष्णतेपासून बचाव करण्यासाठी नव्याने लावलेल्या आंबा, काजू, नारळ आणि सुपारीच्या कलमांना शेडनेट किंवा नारळाच्या झावळ्यांनी सावली करावी. जनावरांना उष्णतेचा ताण टाळण्यासाठी दुपारी उन्हात चरण्यास सोडू नये आणि त्यांना पिण्यासाठी पुरेसे स्वच्छ व थंड पाणी उपलब्ध करून द्यावे. तसेच, कुक्कुटपालनामध्ये शेडमधील पाण्याची भांडी वाढवून पक्ष्यांना थंड पाणी मिळेल याची दक्षता घ्यावी. जमिनीचे आरोग्य टिकवण्यासाठी रब्बी हंगामाची काढणी झाल्यानंतर माती परीक्षण करून घेणे देखील आवश्यक असल्याचे या कृषी सल्ला पत्रिकेत नमूद करण्यात आले आहे.













