सावंतवाडी: प्रतिनिधी : तालुक्यातील कलंबिस्त-वेर्ले मार्गावर शनिवारी दुपारी कार आणि मोटरसायकल यांच्यात झालेल्या समोरासमोर धडकेत तिघेजण जखमी झाले आहेत. या अपघातात दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला असून, कारमधील एका महिलेसह दोन वर्षांची चिमुरडीही जखमी झाली आहे. हा अपघात शनिवारी दुपारी २ वाजण्याच्या सुमारास घडला.
सावंतवाडी कुटीर रुग्णालयातील रक्तपेढीचे कर्मचारी अमित लिंगवत हे आपली पत्नी दिशा आणि दोन वर्षांची मुलगी अन्वी यांच्यासह वेर्ले येथून माडखोल येथे एका विवाह सोहळ्यासाठी कारने येत होते. कलंबिस्त-वेर्ले मार्गावर आले असता, समोरून येणाऱ्या एका मोटरसायकलची त्यांच्या कारला जोरदार धडक बसली. ही धडक इतकी भीषण होती की मोटरसायकल कारच्या दर्शनी भागावर जाऊन आदळली.
या अपघातात मोटरसायकलस्वार सुमित तावडे याला गंभीर दुखापत झाली आहे. तसेच कारमधील प्रवासी आणि पंचायत समिती कार्यालयातील महिला कर्मचारी दिशा अमित लिंगवत (वय ४०) व त्यांची मुलगी अन्वी अमित लिंगवत (वय २) या दोघीही जखमी झाल्या आहेत.
अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी तातडीने मदतीसाठी धाव घेत जखमींना सावंतवाडी येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. सध्या तिघांवरही रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या भीषण अपघातात कार आणि मोटरसायकल या दोन्ही वाहनांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. अपघाताची माहिती मिळताच परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.













