रक्तदात्यांना यंदाही मिळणार विमा कवच – दयानंद गवस
सावंतवाडी | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यात रक्ताचा तुटवडा भासताच रुग्णसेवेचा वसा घेऊन ‘रक्तदान महापुण्यदान’ हे ब्रीद प्रत्यक्ष कृतीत आणणाऱ्या ‘रक्तदूतां’चा ‘ऑन कॉल रक्तदाते संस्था सिंधुदुर्ग’ यांच्या वतीने रविवारी सावंतवाडी येथे यथोचित सन्मान करण्यात आला. जिल्हाभरातील रुग्णालयांसह गोवा-बांबुळी सारख्या ठिकाणी रात्री-अपरात्री धावून जाणाऱ्या रक्तदात्यांच्या कार्याचा गौरव यावेळी मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आला.
आरपीडी हायस्कूलच्या सभागृहात रविवारी हा सोहळा संपन्न झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी पोलीस उपविभागीय अधिकारी तथा संस्थेचे अध्यक्ष दयानंद गवस होते.
प्रमुख पाहुणे म्हणून माजी मुख्याध्यापक कमलाकर धुरी, सामाजिक कार्यकर्ते गुरुनाथ नार्वेकर, आरपीडीच्या मुख्याध्यापिका संप्रवी कशाळीकर, कोमसाप सावंतवाडी अध्यक्ष दीपक पटेकर, लायन्स अध्यक्ष अमेय पई, रोटरी अध्यक्ष ॲड. सिद्धार्थ भांबुरे, पर्यटन संस्थेचे जितू पंडित आणि संस्थेच्या उपाध्यक्षा मीनल सावंत, संस्था सचिव बाबली गवंडे आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन व छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून झाली. प्रास्ताविकात कार्याध्यक्ष महेश रेमुळकर यांनी संस्थेच्या स्थापनेपासूनच्या प्रवासाचा आढावा घेतला. सचिव बाबली गवंडे यांनी अलीकडेच गया (बिहार) येथे संस्थेला मिळालेल्या ‘राष्ट्रीय पुरस्कारा’ची माहिती देत हा सन्मान सर्व रक्तदात्यांचा असल्याचे सांगितले. यावेळी ७८ वेळा रक्तदान करणाऱ्या सुधीर पराडकर यांचा विशेष गौरव करण्यात आला.
अध्यक्षीय भाषणात दयानंद गवस यांनी मोठी घोषणा केली. ते म्हणाले, “रक्तदात्यांच्या अमूल्य कार्यामुळेच संस्थेला नावलौकिक मिळाला आहे. गेल्या वर्षी ९० रक्तदात्यांचा सामूहिक विमा उतरवला होता, त्याचप्रमाणे यंदाही आणखी ५० ते ६० नवीन रक्तदात्यांचा विमा उतरवला जाणार आहे.”
या सोहळ्यात अमेय पई पुरस्कृत संस्थेचे नाव असलेले टी-शर्ट आणि ड्रायफ्रूट्स देऊन वर्षभरात ४, ३ आणि २ वेळा रक्तदान करणाऱ्या दात्यांना गौरविण्यात आले. तसेच, रक्तदान चळवळीत मोलाची साथ देणाऱ्या ३३ मित्र संस्थांना सन्मानपत्र व पुष्पगुच्छ प्रदान करण्यात आले. माजी मुख्याध्यापक कमलाकर धुरी यांनी रक्तदात्यांना आहार आणि तंदुरुस्तीबाबत मोलाचे मार्गदर्शन केले.
यावेळी महावितरणमधून निवृत्त झालेले दिनेश पवार यांनी रक्तदात्यांच्या वतीने मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाला मेघना राऊळ, नाना आंबेरकर, सिद्धार्थ पराडकर, श्री. माणगावकर, सौ. श्रीया माणगावकर, आबा सुकी, गुंडू साटेलकर, राम वाडकर, श्री. कोरगावकर, बाळकृष्ण राणे, जयवंत गवस, वेटे, सुंदरवाडी ग्रुपचे सदस्य, शरद शेटकर यांच्यासह अनेक रक्तदाते, संस्थेचे सदस्य व हितचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कासार्डे कॉलेजचे प्रा. रामचंद्र राऊळ यांनी केले, तर आभार प्रदर्शन दिनेश गावडे यांनी मानले.












