देवगड हापूसच्या नावावर कर्नाटक आंब्याची विक्री… !         

कोकणच्या आंब्यासह ‘मैने’वर पाणी.              

वार्तापत्र -कोकण संतोष वायंगणकर.   

कोकणातील मुंबई-गोवा महामार्गावर कोकणातील हापूस म्हणून या कर्नाटकातील आंब्याची विक्री केली जाते. आंबा कर्नाटक राज्यातला विकणाऱ्या महिला आंध्रप्रदेशच्या आणि नाव कोकणचा हापूस… कोकणातील महामार्गावर जागोजागी या आंध्रप्रदेशवरून आलेल्या महिला ‘देवगड’ हापूस म्हणून कर्नाटकचा आंबा ग्राहकांना विकत आहेत. यापूर्वी काहीवर्षे कोकणचा हापूस म्हणून कर्नाटकचा आंबा विकला जात आहेच. यात सर्वात दुर्दैवाची बाब म्हणजे कोकणातील आंबा बागायतदारांनी कोकणच्या आंबा, काजू बागायतदार शेतकऱ्यांच्या दृष्टीने गंभिर बनत चाललेल्या या कर्नाटक आब्याच्या आक्रमणाचा आणि आंबा खरेदी करणाऱ्या ग्राहकांच्या फसवणुकीचा विचार करता हा विषय इतका गंभिर असूनही त्याबद्दल ग्राहकांचही फार काही म्हणण दिसत नाही…

 

 

कोकणात आंबा पिक काही भागात फारच कमी प्रमाणात आले. तर काही भागात आंबा हंगामाच्या दुसऱ्या टप्यात पुरेसा आंबा आला ही वस्तुस्थिती आहे. एकीकडे कोकणात हवामानातील बदलाचा परिणाम म्हणून आंबा कमी प्रमाणात झाला. एकूण आंबा हंगामात होणाऱ्या टक्केवारीत फक्त १५ टक्केच आंबा बागायतीत आंबा आला. कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या तिन्ही जिल्ह्यांमध्ये यावर्षी आंबा, काजूवर मोठा परिणाम झालेला आहे. यावर्षी आंब्याबरोबरच काजूबागायतींवर परिणाम होऊन दरवर्षीच्या तुलनेत काजू पिक यावर्षी झालेच नाही. कोकणातील आंबा, काजू बागायतदार शेतकऱ्यांना यावर्षी निश्चितच आंबा, काजू पिक न आल्याने शेतकरी आर्थिक संकटात आलेच आहेत. त्यातच परत अवकाळी पाऊस अधून-मधून पडतोय. यामुळे सहाजिकच शेतकऱ्यांना वारंवार हवामानातील बदलाचा आणि आर्थिक तोटा सहन करावा लागत आहे. कोकणातील हापूस आंब्यावर गुजरात, कर्नाटक राज्यातील आंब्याच आक्रमण आहेच. गेल्याकाही वर्षांमध्ये कोकणातील हापूस आंब्यावर विशेषकरून कर्नाटक राज्यातील आंब्याच एक मोठ संकट आहे. गेल्या पंधरा वर्षात कर्नाटक राज्यात आंब्याचा बागा तिथल्या शेतकऱ्यांनी उभ्या केल्या. या बागायतीत आंबा पिकवला गेला. आणि कर्नाटकमधील आंबा कोकणचा हापूस म्हणून विकला जातो. यात आणखी एक बाब म्हणजे आंबा विक्री करणारे बॉक्सवर देवगड हापूस म्हणून प्रिंट केलेले असतात.

कोकणातील मुंबई-गोवा महामार्गावर कोकणातील हापूस म्हणून या कर्नाटकातील आंब्याची विक्री केली जाते. यात गंमतीचा भाग म्हणजे आंबा कर्नाटक राज्यातला विकणाऱ्या महिला आंध्रप्रदेशच्या आणि नाव कोकणचा हापूस कोकणातील महामार्गावर जागोजागी या आंध्रप्रदेशवरून आलेल्या महिला ‘देवगड’ हापूस म्हणून कर्नाटकचा आंबा ग्राहकांना विकत आहेत. यापूर्वी काहीवर्षे कोकणचा हापूस म्हणून कर्नाटकचा आंबा विकला जात आहेच. यात सर्वात दुर्दैवाची बाब म्हणजे कोकणातील आंबा बागायतदारांनी कोकणच्या आंबा, काजू बागायतदार शेतकऱ्यांच्या दृष्टीने गंभिर बनत चाललेल्या या कर्नाटक आब्याच्या आक्रमणाचा आणि आंबा खरेदी करणाऱ्या ग्राहकांच्या फसवणुकीचा विचार करता हा विषय इतका गंभिर असूनही त्याबद्दल ग्राहकांचही फार काही म्हणण दिसत नाही. किंवा कोकणातील आंबा बागायतदार शेतकरीही कुठे चर्चा करताना किंवा त्यावर आवाज उठवताना कधी दिसले नाहीत. खरंतर या इतका विषय गंभिर असतानाही त्यावर कोणीही बोलताना दिसत नाहीत. कोकणातील आंबा बागायतदार शासनाकडून नुकसान भरपाई मिळावी यासाठी जागा होतोय.

पश्चिम महाराष्ट्रातील शेतकरी नेते राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली काही पक्षिय पुढारी शेतकरी संघटीत होत आहेत. आंबा. काजू बागायतदार शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी पक्षाच्या पलिकडे जाऊन विचार करीत कोकणातील शेतकऱ्यांनी संघटीत झालंच पाहिजे. त्याबद्धल दुमत असण्याचे कारण नाही. राज्य सरकारकडे त्यासाठी आग्रही भुमिका घेण्यातही काहीही गैर नाही. परंतु त्याचबरोबर यात आंबा-काजू बागायतदारांना न्याय देण्याची भुमिका असली पाहिजे. राज्यसरकारने कोकणातील बागायतदार शेतकऱ्यांनी चर्चा करावी. त्यातून निश्चित काही चांगला सकारात्मक मार्ग सापडेल. जेणेकरून कोकणातील शेतकऱ्याला आजवर काहीही मिळालेले नाही त्या पार्श्वभूमिवर कोकणातील बागायतदार शेतकऱ्याला चांगली नुकसान भरपाई मिळेल. मुळात कोणत्याही विषयात नुकसान भरपाई पुरेशी आणि समाधानकारक कधीच मिळत नसते. याच कारण झालेलं नुकसान आणि मिळणारी नुकसान भरपाई यामध्ये निश्चितपणे मोठी तफावत असते. कोणत्याही शेती बागायतीच नुकसान हे फार मोठं असत. आणि मिळणाऱ्या नुकसान भरपाईने शेतकऱ्याला थोडाफार दिलासा मिळतो. परंतु आजवर कधीही झालेले नव्हते इतके नुकसान आंबा-काजू बागायतदारांचे झालेले आहे. राज्यसरकारने कोकणातील शेतकऱ्यांना मोठ्याप्रमाणात आर्थिक सहाय्य दिलेच पाहिजे. कोकणातील शेतकरी कधीही सरकारकडे हात पसरत नाहीत. किंवा आंबा, काजू, भातशेतीचे नुकसान झाले म्हणूनही कधी सांगत नाहीत. जे काही शेती, बागायतीचे नुकसान झाले असेल तो सोसून डोक्याला हात लावून न बसता, रडत न बसता, आलेल्या आर्थिक संकटाला सामोरे जात कोकणातला शेतकरी सातत्याने प्रयत्न करत रहातो. त्यात त्याला कधी यश येत किंवा कधी अपयशाचा सामना करावा लागतो. संघर्षातही कोकण कधी हार मानत नाही.

 

चौकट : कोकणच्या मैनेवर पडले पाणी…!

मे महिन्यात कोकणात निसर्गाने दिलेली अनेक फळ पिक देतात. जांभुळ, करवंद, फणस, आंबा, काजू अशी अनेक नावं घेता येतील इतकी फळ कोकणात पिकतात. जांभुळाला आता मोठी मागणी आहे. जगभरात जांभुळ हे डायबिटीस आजारावर रामबाण उपाय म्हणून ओळखलं जातं. जांभुळ तर महाराष्ट्रातील अनेक भागात पिकतात. परंतु कोकणातील जांभुळ त्याची टेस्ट आणि डायबिटीससाठी त्याची उपयुक्तता ही सर्वाधिक आहे. त्यामुळेच आज चांगल्या बाजार भावाने कोकणातील जांभुळ विकली जातात. मुंबईच्या बाजारात तर अनेक भागातून जांभुळ विक्रीला येतात. अगदी कोकणातील टपोऱ्या वाटणाऱ्या जांभुळांपेक्षाही आकाराने अधिक मोठी असलेली जांभुळ मुंबईच्या बाजारात अनेक ठिकाणी विक्रीला दिसतात. परंतु कोकणातील जांभुळाची ‘टेस्ट इज बेस्ट’ असच म्हणाव लागेल. कोकणातील जांभुळाची टेस्ट हेच त्याचे वेगळेपण आहे. त्यामुळेच कोकणची जांभुळ मुंबईच्या बाजारातही दिमाखात मिरवत असतात. अनेक भागातून आलेल्या जांभुळमध्येही स्वत:कडे लक्ष वेधून घेतात. मुंबईच्या बाजारातील जांभुळाची मिजास काही औरच असते. कोकणची मैना म्हणून करवंद, जांभुळ विकली जातात. करवंद एप्रिलच्या मध्यावर करवंदांच्या झाळींवर दिसू लागतात. करवंद कच्ची असताना त्याच तिखट, मिठ, थोडासा तेलाचा शिडकावा केलेलं लोणच. मालवणीत याच करवंदांच्या लोणच्याला खिमाट म्हणतात. आज साठीत, सत्तरीत असणाऱ्याना आणि ज्यांच शिक्षण गावातील जिल्हा परिषदेच्या मराठी शाळेत झालेलं असेल तर त्या बहुतांशांनी या करवंदांच्या ‘खिमाटा’ ची चाखलेलीच असणार, प्राथमिक शाळेत जाताना वाटेत करवंदांची अनेक ठिकाणी काटेरी झुडव असायची. त्यावरची करवंद खातच आजचे पन्नाशी, साठी, सत्तरीतले अनेकांनी यासर्वांची टेस्ट घेतली आहे. नुसत्या कल्पनेनेच त्यावेळचे दिवस आठवत असतील. तर अशा या कोकणच्या ‘काळी मैना’ म्हणून करत ओळख असलेल्या करवंदांवर अवकाळी पावसाने कोकणच्या मुलखातल्या लोकांना आता करवंदांचा आस्वाद कितपत घेता येईल हे सांगण अवघड आहे. एकदा या करवंदांवर पाणी पडलं की ती खराब होतात. त्यामुळे यावर्षीच्या अवकाळी पावसाने काळ्या मैनेचा कोकणवासियांना आस्वाद घेता येणार नाही असं दिसतय.