खेड (प्रतिनिधी) : शिक्षण आणि साहित्य क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या खेड तालुक्यातील माणी नंबर एक शाळेतील पदवीधर शिक्षिका तसेच नावाजलेल्या कवयित्री दिप्ती दिलीप यादव यांना मराठा क्रांती स्वराज्य संघटनेकडून प्रतिष्ठेचा “राष्ट्रीय विद्या गौरव पुरस्कार” प्रदान करण्यात आला. देशभरातील विविध क्षेत्रांत उल्लेखनीय काम करणाऱ्या व्यक्तींना गौरविणाऱ्या या राष्ट्रीय स्तरावरील पुरस्कार सोहळ्यात दिप्ती यादव यांच्या कार्याचा विशेष सन्मान करण्यात आला.
खेड येथील बिजघर साई मंदिर येथे आयोजित कार्यक्रमात मराठा क्रांती स्वराज्य संघटनेचे राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष सदानंदराव भोसले यांच्या प्रमुख उपस्थितीत खेडच्या नगराध्यक्षा माधवी बुटाला यांच्या हस्ते दिप्ती यादव यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला. शिक्षण क्षेत्रात विद्यार्थ्यांसाठी आदर्शवत कार्य करत असतानाच साहित्य क्षेत्रातही त्यांनी आपल्या कवितांद्वारे वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्यांच्या साहित्यिक योगदानालाही विविध स्तरांवर गौरविण्यात आले आहे.
दिप्ती यादव यांना यापूर्वीही अनेक राज्यस्तरीय तसेच राष्ट्रीय पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. मात्र राष्ट्रीय विद्या गौरव पुरस्कारामुळे खेड तालुक्याच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला असून तालुक्याचे नाव राज्यासह राष्ट्रीय स्तरावर झळकले आहे. त्यांच्या या यशाबद्दल जिल्हाभरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.












