खेड (प्रतिनिधी) : सन १९५८ च्या मुंबई ग्रामपंचायत पोटनिवडणूक नियमांनुसार खेड तालुक्यातील चिंचवली ग्रामपंचायतीच्या नव्या कार्यकाळासाठी सरपंच व सदस्य निवड प्रक्रिया नुकतीच पार पडली. या निवडणुकीत सरपंचांसह सर्व सदस्य बिनविरोध निवडून आल्याने गावात आनंद आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
यावेळी ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी श्री. गणेश सखाराम कांदेकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली. तसेच सर्वसाधारण स्त्री प्रवर्गातून श्रीमती अनुष्का अविनाश पवार आणि श्रीमती वनीता सखाराम रासळ, तर सर्वसाधारण प्रवर्गातून श्री. किशोर विठु चव्हाण आणि श्री. सुरेश धोंडू जोगळे यांची सदस्यपदी बिनविरोध निवड झाली.
गावातील एकोप्याचे दर्शन घडवणारी ही निवड प्रक्रिया शांततेत आणि सामंजस्याने पार पडल्याने ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे. गावाच्या विकासासाठी एकमताने नेतृत्व निवडण्यात आल्याने ग्रामस्थांमध्ये सकारात्मक भावना व्यक्त होत असून नव्या ग्रामपंचायतीकडून विकासाभिमुख, पारदर्शक आणि लोकाभिमुख प्रशासनाची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
उच्च शिक्षित सरपंच म्हणून गणेश कांदेकर यांच्यावर ग्रामस्थांनी एकमताने विश्वास दाखवला असून त्यांच्या अनुभवाचा आणि नेतृत्वाचा गावाच्या सर्वांगीण विकासासाठी निश्चितच फायदा होईल, असा विश्वास ग्रामस्थांकडून व्यक्त करण्यात येत आहे.
या निवडीबद्दल गावातील मान्यवर, सामाजिक कार्यकर्ते आणि ग्रामस्थांनी नव्याने निवडून आलेल्या सरपंच व सदस्यांचे अभिनंदन करून पुढील कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.













