आवाशी येथे उड्डाणपुलाच्या कामामुळे दररोज वाहतूक कोंडी; प्रवाशांना मोठा मनस्ताप

खेड (प्रतिनिधी) : मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम अंतिम टप्प्यात आले असतानाच खेड तालुक्यातील आवाशी गुणदे फाटा येथे सुरू असलेल्या उड्डाणपूल व अंडरपासच्या कामामुळे दररोज मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होत आहे. ठेकेदार आणि महामार्ग प्राधिकरण यांच्यात समन्वयाचा अभाव असल्याने वाहतुकीचे योग्य नियोजन होत नसल्याची नागरिकांमधून नाराजी व्यक्त होत आहे.
मुंबई-गोवा महामार्गावरील चौपदरीकरणाचे काम बहुतांश पूर्णत्वाकडे गेले असले तरी लोटे परशुराम औद्योगिक वसाहतीचे मुख्य प्रवेशद्वार असलेल्या आवाशी गुणदे फाटा येथे अंडरपासची आवश्यकता असल्याचे डिसेंबर २०२५ मध्ये महामार्ग प्राधिकरणाच्या निदर्शनास आले. त्यानंतर येथे उड्डाणपूल उभारणीचे काम तातडीने सुरू करण्यात आले. मात्र, काम सुरू झाल्यानंतर वाहतुकीचे योग्य नियोजन न केल्यामुळे वाहनचालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.
औद्योगिक वसाहत महामार्गालगत असल्यामुळे दररोज शेकडो अवजड वाहने या मार्गावरून ये-जा करतात. विशेषतः सायंकाळी पाच ते साडेपाच वाजण्याच्या सुमारास वाहतुकीचा ताण मोठ्या प्रमाणात वाढत असून दोन्ही बाजूंना वाहनांच्या लांबच लांब रांगा लागत आहेत. पूर्वेकडील बाजूस एसटी बसथांबा असल्याने त्याचाही वाहतुकीवर परिणाम होत आहे.
बुधवारी पश्चिमेकडील सर्व्हिस रोडवर पंढरपूर ते दापोली जाणारी एसटी बस अचानक बंद पडल्याने काही काळ एकाच मार्गिकेतून वाहतूक सुरू ठेवावी लागली. त्यामुळे वाहतूक कोंडीत आणखी भर पडली आणि प्रवाशांना बराच वेळ खोळंबून राहावे लागले.
सध्या पर्यटन हंगाम सुरू असल्याने कोकणात येणाऱ्या पर्यटकांच्या वाहनांची संख्याही वाढली आहे. परिणामी, या कोंडीचा फटका पर्यटकांसह स्थानिक नागरिकांनाही बसत आहे. पावसाळ्यापूर्वी हे काम पूर्ण न झाल्यास भविष्यात वाहतूक कोंडीची समस्या अधिक गंभीर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे महामार्ग प्राधिकरणाने आणि संबंधित ठेकेदाराने तातडीने वाहतुकीचे प्रभावी नियोजन करून नागरिकांना दिलासा देण्याची मागणी होत आहे.