गेल्या चार दिवसांपासून कोत्रेवाडी अंधारातच, महावितरण संबंधित यंत्रणा जबाबदार

बुधवारी पाचव्या दिवशी वीज ठप्पच

संतोष कोत्रे
लांजा-: चक्रीवादळानंतर गेल्या चार दिवसापासून लांजा कोत्रेवाडी अंधारातच बुडालेली आहे. आज बुधवारी पाचवा दिवस उजाडला तरीही येथील वीज पुरवठा सुरू झालेल्या नसल्याने आम्ही लांजा शहरात आहोत की एखाद्या ग्रामीण भागातील आदिवासी पाड्यावर ? असा संतप्त सवाल येथील नागरिकांनी उपस्थित केला आहे. महावितरण आणि संबंधित यंत्रणा यांच्या चालढकल भूमिकेबाबत कोत्रेवाडी नागरिकांतून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
शनिवारी ९ मे रोजी सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास चक्रीवादळासह आलेल्या पावसाने तालुक्यात दाणादाण उडवली आहे. त्याचा फटका कोत्रे वाडीलाही बसला होता. दोन वीज खांब आणि वीज वाहिन्या तुटल्याने येथील वीजपुरवठा खंडित झाला होता. त्यानंतर गेल्या चार दिवसांपासून येथील वीज पुरवठा सुरू करण्यात आलेला नाही. शहरासह तालुक्याचा काही भागांमधील वीज परवठा सुरळीत करण्यात आला. मात्र लांजा नगरपंचायत क्षेत्रात असणाऱ्या कोत्रे वाडी येथील वीजपुरवठा सुरळीत करण्याबाबत महावितरण आणि संबंधित यंत्रणा यांनी उदासीन भूमिका घेतली होती. शहरातील अन्य वाड्यांमध्ये वीज पुरवठा दोन दिवसात सुरळीत झाला. परंतु चार दिवस उलटून गेले तरीही कोत्रेवाडी येथील वीज परवठा सुरळीत करण्याबाबत संबंधित यंत्रणेने दुर्लक्ष केले आहे.
आज बुधवारी पाचव्या दिवशी ही दुपारपर्यंत वीज पुरवठा सुरळीत झालेला नाही. त्यामुळे आम्ही लांजा शहरात राहतो की एखाद्या आदिवासी पाड्यावर ? संबंधित यंत्रणेला येथील वीज पुरवठा सुरळीत करण्यात काही देणे घेणे आहे की नाही? असा संतप्त सवाल येथील नागरिकांनी उपस्थित केला आहे. चार चार दिवस शहरातील वीजपुरवठा सुरळीत होत नाही यासारखी दुसरी शोकांतिका नाही, अशा भावना येथील नागरिकांकडन व्यक्त होत आहेत.