हार्दिकचा जोरदार सराव चर्चेत
मुंबई इंडियन्सच्या संघरचनेवर प्रश्नचिन्ह
मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पंड्या पाठीच्या दुखापतीतून सावरत असून त्याने पुन्हा एकदा जोरदार सरावाला सुरुवात केली आहे. आयपीएल 2026 मधील सलग दोन सामने गमावल्यानंतर त्याच्या पुनरागमनाबाबत उत्सुकता वाढली आहे. रिलायन्स कॉर्पोरेट पार्कमध्ये त्याने तीन तासांहून अधिक वेळ सराव केल्याने अनेक चर्चांना उधाण आले आहे. संघातील वातावरण आणि हार्दिकच्या अनुपस्थितीबाबत विविध प्रश्न उपस्थित होत आहेत. दरम्यान, मुंबई इंडियन्सचा खराब हंगाम पाहता आता युवा खेळाडूंना संधी मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
नवी दिल्ली : मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पंड्या याने पुन्हा एकदा पूर्ण क्षमतेने सराव सुरू केला आहे. मंगळवारी त्याने रिलायन्स कॉर्पोरेट पार्क येथे तब्बल तीन तासांपेक्षा अधिक वेळ मेहनत घेतली. आयपीएल 2026 मध्ये लखनौ सुपर जायंट्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू विरोधातील सामने त्याने पाठीच्या दुखापतीमुळे गमावले होते.
संघ व्यवस्थापनाकडून हार्दिक दुखापतीतून सावरत असल्याचे सांगितले जात असले तरी त्याच्या या तगड्या सराव सत्रामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. हार्दिकने सोशल मीडियावर सरावाचे काही व्हिडिओही शेअर केले आहेत. त्यामुळे संघातील वातावरणाबाबत आणि त्याच्या अनुपस्थितीमागील कारणांबाबत चर्चा रंगू लागली आहे. प्रहार डिजिटलने यापूर्वी ड्रेसिंग रूममधील वातावरण सुरळीत नसल्याचे वृत्त दिले होते.
दरम्यान, मुंबई इंडियन्सचा संघ मंगळवारी चंदीगडहून धर्मशाळा येथे पोहोचला. मात्र या प्रवासात हार्दिक पंड्या आणि कार्यवाहक कर्णधार सूर्यकुमार यादव सहभागी नव्हते. सूर्यकुमार यादवला नुकतेच कन्यारत्न प्राप्त झाले असून तो काही दिवस कुटुंबासोबत असल्याचे समजते. रायपूरमधील सामन्यानंतर हार्दिक आणि काही खेळाडू मुंबईला परतले होते.
आता पंजाब किंग्ज विरोधातील सामन्यापूर्वी सूर्यकुमार संघात परतण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र हार्दिक धर्मशाळेत संघासोबत कधी दाखल होणार, याबाबत अद्याप स्पष्टता नाही. संघ व्यवस्थापन त्याच्या फिटनेसवर बारकाईने लक्ष ठेवून असल्याचे सांगितले जात आहे.
मुंबई इंडियन्सचा संघ सध्या गुणतालिकेत नवव्या स्थानावर असून यंदाचा हंगाम त्यांच्यासाठी निराशाजनक ठरला आहे. उर्वरित सामन्यांमध्ये युवा खेळाडूंना संधी देत संघाची बेंच स्ट्रेंथ तपासण्यावर भर दिला जाऊ शकतो. तसेच सलग सामने खेळणाऱ्या प्रमुख खेळाडूंना विश्रांती देण्याचाही विचार सुरू असल्याचे बोलले जात आहे.
सूर्यकुमार यादव आणि टिळक वर्मा यांनी काही महत्त्वाच्या खेळी केल्या असल्या तरी संघाला सातत्यपूर्ण कामगिरी करता आलेली नाही. दुसरीकडे जसप्रीत बुमराहने जवळपास एकहाती लढा दिल्याने त्यालाही विश्रांतीची गरज असल्याचे मत व्यक्त होत आहे. मुख्य प्रशिक्षक महेला जयवर्धने अजूनही आपल्या मुख्य खेळाडूंवर विश्वास दाखवत आहेत. मात्र आगामी हंगाम डोळ्यासमोर ठेवून नव्या चेहऱ्यांची चाचणी घेण्याची वेळ आता संघावर आली असल्याचे मानले जात आहे.











