नारंगी फाट्याजवळ गुरे भरण्याच्या संशयावरून तरुणांना मारहाण; खेड पोलिसांत गुन्हा दाखल

खेड (प्रतिनिधी) : खेड तालुक्यातील नारंगी फाट्याजवळ गुरे वाहनात भरल्याच्या संशयावरून काही तरुणांना मारहाण झाल्याची घटना मंगळवारी मध्यरात्री घडली. या प्रकरणी खेड पोलिस ठाण्यात तिघांविरोधात भारतीय न्यायसंहिता २०२३ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, १३ मे रोजी रात्री सुमारे १२.३० वाजण्याच्या सुमारास नारंगी फाटा परिसरात ही घटना घडली. याप्रकरणी त्रुतीक सुनील जाधव (वय २६, मूळ रा. चिंचघर प्रभुवाडी, ता. खेड, सध्या रा. विरार, मुंबई) यांनी खेड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
फिर्यादीनुसार, फिर्यादीचा भाऊ सुरज सुनील जाधव याच्यावर गाडीत गुरे भरल्याचा संशय घेत आरोपी त्रुपेश निंबाळकर, रिक्षावाले चव्हाण आणि खेडेकर यांनी वाद घालत मारहाण केली. या मारहाणीत सुरज जाधव यांच्या डाव्या डोळ्याच्या भुवईजवळ कोणत्यातरी वस्तूने मारल्याने गंभीर दुखापत झाली असून त्यातून रक्तस्त्राव झाला.
तसेच आरोपींनी फिर्यादी त्रुतीक जाधव यांनाही बांबूच्या काठीने मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला आहे. यात त्यांच्या उजव्या खांद्याला दुखापत झाली. याचवेळी तेजस शेलार, प्रणय शेलार, जीवन कदम आणि विकी जाधव यांनाही धक्काबुक्की करत शिवीगाळ करण्यात आल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
या घटनेप्रकरणी खेड पोलिसांनी भारतीय न्यायसंहिता २०२३ च्या कलम 115(2), 118(1), 352 आणि 3(5) अन्वये गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.