खेड एसटी आगारात ‘जिजाऊ’ बसेसचे आगमन; पाच नवीन गाड्यांचा सोमवारी लोकार्पण सोहळा

खेड : प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्याचे गृहराज्यमंत्री तथा खेड-दापोली-मंडणगड मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार मा. योगेशदादा रामदासभाई कदम यांच्या प्रयत्नांतून खेड एसटी आगाराला महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या ‘जिजाऊ’ मालिकेतील पाच नवीन बस उपलब्ध झाल्या आहेत. या बसांचा लोकार्पण सोहळा सोमवार, दि. १५ जून २०२६ रोजी सकाळी ९ वाजता खेड एसटी स्थानक येथे आयोजित करण्यात आला आहे.
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने प्रवाशांना सुरक्षित, आरामदायी व दर्जेदार प्रवासाची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी ‘जिजाऊ’ बस सेवा सुरू केली आहे. या अंतर्गत खेड आगाराला पाच नवीन बस मिळाल्याने खेड, दापोली, मंडणगड तसेच ग्रामीण भागातील प्रवाशांना अधिक चांगली वाहतूक सेवा मिळणार आहे. तसेच जुन्या बसांवरील ताण कमी होऊन विविध मार्गांवरील सेवा अधिक सक्षमपणे चालविणे शक्य होणार आहे.
या लोकार्पण सोहळ्याचे उद्घाटन जिल्हा परिषद सदस्य अरुण उर्फ चंद्रकांत कदम यांच्या हस्ते होणार असून शिवसेना उपनेते संजयराव कदम, जिल्हाप्रमुख शशिकांत चव्हाण, खेड नगराध्यक्ष माधवी बुटाला आणि सभापती अफिया पालेकर यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. याशिवाय नगरपरिषदेचे पदाधिकारी, नगरसेवक-नगरसेविका, शिवसेना, युवासेना, महिला आघाडी व युवती सेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.
शिवसेना खेड शहरप्रमुख कुंदन नागेश सातपुते यांनी सर्व पदाधिकारी, लोकप्रतिनिधी व कार्यकर्त्यांना या कार्यक्रमास आवर्जून उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे. खेड आगारात दाखल झालेल्या या नवीन ‘जिजाऊ’ बसेसमुळे प्रवाशांना अधिक दर्जेदार सेवा मिळण्यास मदत होणार असून सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेला आणखी बळकटी मिळणार असल्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.