आ. दीपक केसरकर व नगराध्यक्षांच्या उपस्थितीत महत्वपूर्ण बैठक
सावंतवाडी । प्रतिनिधी :सावंतवाडी शहर आणि परिसरातील आरोग्य सुविधांचा विस्तार करण्याच्या दृष्टीने एक मोठे पाऊल उचलले जात आहे. धारगळ-गोवा येथील प्रसिद्ध ‘ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ आयुर्वेद’ची (AIIA) एक उपशाखा सावंतवाडीत सुरू करण्यासाठी हालचालींना वेग आला आहे. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी आमदार दीपक केसरकर यांच्या अध्यक्षतेखाली सावंतवाडी नगरपालिकेच्या लोकमान्य टिळक सभागृहात नुकतीच एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. यावेळी व्यासपीठावर नगराध्यक्षा सौ. श्रद्धा भोंसले, पालिकेचे मुख्याधिकारी आणि सर्व नगरसेवक उपस्थित होते. सावंतवाडीत आयुर्वेदाचे उत्तम रुग्णालय झाल्यास त्याचा फायदा केवळ शहरालाच नव्हे, तर संपूर्ण तालुक्याला होईल, असा विश्वास या बैठकीत व्यक्त करण्यात आला.
*तज्ज्ञ डॉक्टरांच्या पथकाकडून जागेची पाहणी*
या प्रकल्पाच्या पूर्वतयारीचा भाग म्हणून गोवा येथील आयुर्वेद संस्थेच्या तज्ज्ञ डॉक्टरांच्या पथकाने आज सावंतवाडीला भेट देऊन जागेची प्रत्यक्ष पाहणी केली. या पथकामध्ये डॉ. पी. के. प्रजापती, प्रोफेसर डॉ. सुजाता कदम आणि डॉ. भार्गव भिडे यांचा समावेश होता. या टीमने नगरपालिकेच्या मालकीच्या प्रस्तावित जागेची तांत्रिक पाहणी केली आणि आवश्यक ती माहिती प्रशासनाकडून जाणून घेतली.
*आरोग्य व्यवस्थेत पडणार मोठी भर*
धारगळ येथील मुख्य रुग्णालयामध्ये ज्या धर्तीवर उपचार आणि सुविधा मिळतात, तशीच सुसज्ज शाखा सावंतवाडीत कार्यान्वित व्हावी, यासाठी आमदार दीपक केसरकर यांनी विशेष पुढाकार घेतला आहे. यासंदर्भात दिल्ली आणि राज्य स्तरावर प्रशासकीय पातळीवर जोरदार प्रयत्न सुरू आहेत.
सावंतवाडी नगरपालिकेच्या जागेत हे रुग्णालय सुरू झाल्यास स्थानिक नागरिकांना आणि ग्रामीण भागातील रुग्णांना दर्जेदार आयुर्वेदिक उपचार स्थानिक स्तरावर उपलब्ध होतील. ही शाखा लवकरात लवकर लोकांच्या सेवेसाठी खुली व्हावी, या उद्देशाने बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली. या नव्या आरोग्य सुविधेमुळे सावंतवाडीच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला जाणार असून आरोग्य व्यवस्थेला मोठी बळकटी मिळणार आहे.













