आमदार दीपक केसरकर यांनी पाळला ख्रिस्ती समाजाला दिलेला शब्द!
सावंतवाडी | प्रतिनिधी : माजी मंत्री तथा सावंतवाडीचे आमदार दीपक केसरकर यांनी निवडणूक काळात ख्रिस्ती समाजाला दिलेला शब्द पूर्ण केला आहे. जिल्हा वार्षिक योजना सन २०२५-२६ अंतर्गत, सावंतवाडी जुना बाजार येथील रोझरी चॅपेल येथे बसवण्यात आलेल्या सौरऊर्जा हायमास्ट दिव्याचे लोकार्पण नुकतेच नगरसेवक व स्थानिक नागरिकांच्या उपस्थितीत उत्साहात पार पडले. या हायमास्टमुळे चॅपेल गल्ली आणि परिसरातील प्रदीर्घ काळची मागणी पूर्ण होऊन संपूर्ण परिसर प्रकाशाने उजळून निघाला आहे.
या कामासाठी स्थानिक नगरसेवक देव्या सूर्याजी आणि नगरसेविका शर्वरी धारगळकर यांनी विशेष प्रयत्न केले होते. या दोघांच्याही सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे आमदार केसरकर यांनी या हायमास्टसाठी ३ लाख ५० हजार रुपयांचा निधी मंजूर केला होता. या निधीतून सौरऊर्जेवर चालणारा हायमास्ट बसवण्यात आला असून, शाश्वत ऊर्जा स्त्रोताचा वापर केल्याबद्दल परिसरातून समाधान व्यक्त होत आहे.
नगरपरिषद निवडणुकीच्या प्रचारादरम्यान आमदार दीपक केसरकर यांनी जुना बाजार परिसरातील ख्रिस्ती समाजाशी संवाद साधला होता. त्यावेळी त्यांनी या परिसरातील सोयीसुविधा विकसित करण्याबाबत आणि प्रलंबित प्रश्न सोडवण्याबाबत शब्द दिला होता. सौरऊर्जा हायमास्ट कार्यान्वित झाल्याने केसरकर यांनी आपला शब्द पाळला असल्याची भावना स्थानिक नागरिकांनी व्यक्त केली आहे.
लोकार्पण सोहळ्याला जुना बाजार परिसरातील ख्रिस्ती बांधव आणि भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. आपल्या भागातील प्रदीर्घ काळची मागणी पूर्ण झाल्याबद्दल उपस्थित सर्वांनी आमदार दीपक केसरकर, नगरसेवक देव्या सूर्याजी आणि नगरसेविका शर्वरी धारगळकर यांचे विशेष आभार मानले.
हा परिसर अनेक दिवसांपासून अंधारात होता. हायमास्टमुळे आता येथील सुरक्षितता आणि सुविधा वाढली आहे. दिलेले आश्वासन वेळेत पूर्ण केल्याबद्दल आम्ही आमदार महोदयांचे ऋणी आहोत, असे स्थानिकांनी म्हटले.












