सावंतवाडी । प्रतिनिधी : ऑनलाईन औषध विक्रीला विरोध, कॉर्पोरेट कंपन्यांची चुकीची किंमत धोरणे आणि बनावट औषधांचा धोका यांविरुद्ध अखिल भारतीय औषध विक्रेता संघटनेने देशव्यापी लढा पुकारला आहे. या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी २० मे रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व औषध विक्रेते २४ तासांचा कडकडीत बंद पाळणार आहेत. या निषेधाचा भाग म्हणून शुक्रवारपासून सावंतवाडीतील औषध विक्रेत्यांनी काळ्या फिती लावून कामाला सुरुवात केली आहे.
सावंतवाडी तालुक्यासह संपूर्ण जिल्ह्यात या आंदोलनाची तयारी सुरू झाली असून, १९ मे पर्यंत सर्व औषध दुकानांतील मालक आणि कर्मचारी काळ्या फिती लावून निषेध नोंदवणार आहेत. १९ मे च्या मध्यरात्री १२ वाजल्यापासून ते २० मे च्या मध्यरात्री १२ वाजेपर्यंत जिल्ह्यातील सर्व औषध दुकाने पूर्णपणे बंद राहतील.
ऑनलाईन औषध विक्रीवर त्वरित बंदी घालावी, २६ मार्च २०२० ची अधिसूचना केंद्र सरकारने मागे घ्यावी आणि कॉर्पोरेट कंपन्यांचे अवास्तव डिस्काउंट धोरण बंद करावे, अशा मागण्या संघटनेने केल्या आहेत. पंतप्रधानांना निवेदन देऊनही अद्याप कोणतीही कार्यवाही न झाल्याने हा बंद पुकारण्यात आला असल्याचे सिंधुदुर्ग डिस्ट्रिक्ट केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष आनंद रासम यांनी सांगितले. हे आंदोलन देशहितासाठी आणि रुग्णांच्या सुरक्षेसाठी असल्याचेही त्यांनी नमूद केले. दरम्यान, बंद काळात आपत्कालीन स्थितीत रुग्णांची गैरसोय होऊ नये, यासाठी संघटनेने आवश्यक खबरदारी घेतली आहे.












