तिघे जखमी, सावंतवाडी पोलिसांत गुन्हा दाखल
सावंतवाडी: मुंबई-गोवा महामार्गावरील झाराप-पत्रादेवी बायपास मार्गावर वेत्ये खांबलवाडी येथील श्री संत गोरा कुंभार मंदिरालगत दोन दुचाकींमध्ये झालेल्या भीषण अपघातात गोव्यातील एका युवतीचा उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू झाला, तर अन्य तिघे जण जखमी झाले आहेत. ही घटना सोमवारी, ३१ ऑगस्ट रोजी सकाळी ९ वाजताच्या सुमारास घडली. शोभा फर्नांडिस (वय २६, रा. मडगाव, गोवा) असे अपघातात मयत झालेल्या युवतीचे नाव आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, डेनसन उर्फ डोनाल्ड लिबर्टस डीनिस (वय २७, रा. कुंकोलीम, साऊथ गोवा) हे आपली मैत्रीण शोभा फर्नांडिस हिच्यासह रॉयल एनफिल्ड (क्रमांक GA 08 AL 9055) वरून जात होते. वेत्ये खांबलवाडी येथे पुढील दुचाकीस्वार आरोपी प्रदीप रामचंद्र वेंगुर्लेकर (वय ३७, रा. सातोसे लिंगेवाडी, सावंतवाडी) याने समोर कुत्रा आडवा आल्याने आपल्या ताब्यातील जुपिटर दुचाकीचा (क्रमांक MH 07 AM 8155) अचानक ब्रेक लावला. त्यामुळे मागून येणाऱ्या डेनसन यांनीही अचानक ब्रेक दाबल्याने त्यांची दुचाकी जुपिटरला धडकली. या भीषण धडकेमुळे मागे बसलेली शोभा ही महामार्गावरून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या कंटेनरच्या बाजूला असलेल्या लोखंडी गार्डवर जाऊन आदळली आणि गंभीर जखमी झाली.
अपघाताचा आवाज ऐकून वेत्ये सरपंच गुणाजी गावडे यांच्यासह स्थानिक नागरिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत तेथीलच रुग्णवाहिकेतून सर्व जखमींना उपचारासाठी सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारादरम्यान गंभीर जखमी शोभा हिची प्राणज्योत मालवली. या अपघातात फिर्यादी डेनसन यांच्यासह जुपिटरवरील मागे बसलेले साक्षीदार दिगंबर मोहन सावंत व जुपिटर चालक जखमी झाले असून दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे.
या प्रकरणी डेनसन उर्फ डोनाल्ड डीनिस यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सावंतवाडी पोलीस ठाण्यात आरोपी जुपिटर चालक प्रदीप वेंगुर्लेकर याच्याविरोधात भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम १०६(१), १२५(a)(b), २८१ आणि एमव्हीए १८४ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी राजेश भागवत, परीविक्षाधीन उपविभागीय पोलीस अधिकारी शेलार आणि पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम यांनी घटनास्थळाला भेट देऊन पाहणी केली. हवालदार प्रवीण वालावलकर यांनी गुन्हा दाखल केला असून या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत.













