सावंतवाडी :
सावंतवाडी-शिरोडा मार्गावरील निरवडे येथे गुरुवारी मध्यरात्री १ वाजण्याच्या सुमारास एका भरधाव कारचा अपघात झाला. ही कार रस्त्याकडेला असलेल्या एका घराच्या संरक्षक भिंतीला धडकली. या प्रकरणी सावंतवाडी पोलिसांनी संशयितांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, निरवडे येथील धुरी गॅरेजसमोरून मारुती कार वेगाने जात असताना टायर फुटल्याने चालकाचा ताबा सुटला. ही कार थेट विनोद नाईक यांच्या घराच्या संरक्षक भिंतीवर जाऊन धडकली. यामध्ये भिंतीचे आणि कारचे मोठे नुकसान झाले. अपघातानंतर कारमधील व्यक्तींनी नाईक यांच्या घरासमोर उभ्या असलेल्या दुसऱ्या कारची ‘स्टेपनी’ काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, आवाज झाल्याने ग्रामस्थ आणि शेजारी जागे झाले.
ग्रामस्थांनी पकडण्याचा प्रयत्न केला असता संशयित आपली कार तिथेच सोडून पळून गेले. पोलिसांनी घटनेचे सीसीटीव्ही फुटेज प्राप्त केले असून शुक्रवारी अपघातग्रस्त वाहन जप्त केले. हयगयीने वाहन चालवून मालमत्तेचे नुकसान करणे आणि चोरीचा प्रयत्न करणे या कलमान्वये पोलिसांनी संशयितांवर गुन्हा दाखल केला आहे. पोलीस हवालदार सुरेश पाटील या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.












