दापोली : पालगड येथील हार्डवेअरचे दुकान फोडले; चोरट्यांनी लंपास केला ३२ हजारांचा मुद्देमाल आरोपी अटकेत!

दापोली: तालुक्यातील पालगड पवारवाडी येथील एक हार्डवेअरचे दुकान फोडून अज्ञात चोराने दुकानातील सुमारे ३२ हजार १० रुपये किमतीचे इलेक्ट्रिकल आणि हार्डवेअरचे साहित्य चोरून नेल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी दापोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी तत्परतेने कारवाई करत आरोपीला अटक केली आहे.
याबाबत दापोली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी अभिजित विठोबा कदम (वय ३४, व्यवसाय-गाडी धंदा, रा. पालगड बेलवाडी, दापोली) यांच्या मालकाचे पालगड पवारवाडी येथे हार्डवेअरचे दुकान आहे. दिनांक १२ मे २०२६ रोजी रात्री ८:०० वाजे ते दिनांक १३ मे २०२६ रोजी सकाळी ८:०० वाजण्याच्या पूर्वी, अज्ञात चोरट्याने या दुकानाच्या पाठीमागील लोखंडी जाळी कोणत्या तरी हत्याराने उचकटून आत अनाधिकृतपणे प्रवेश केला. चोराने दुकानातून मौल्यवान वायर बंडल, पंखे आणि इतर साहित्य लंपास केले.
चोरीला गेलेल्या साहित्याचा तपशील:
दुकानातून एकूण ३२,०१० रुपयांचा माल चोरीला गेला, ज्यामध्ये खालील साहित्याचा समावेश आहे:
• २४,००० रुपये किमतीचे ४ एम.एम. चे १ सर्विस वायर बंडल
• १,४५० रुपये किमतीचे दोन सिलिंग फॅन
• १,००० रुपये किमतीचे वन वे २० नग
• ८७० रुपये किमतीची २ कोर वायर (३० मीटर)
• ८०० रुपये किमतीचा एक अडीच इंची पाईप
• ७०० रुपये किमतीचे ४ वे ७ नग
• ६३० रुपये किमतीचे होज निपल (७ नग)
• ५६० रुपये किमतीचे ८ रेड्यूसर आणि ४२० रुपयांचे पाऊण इंच रेड्यूसर (६ नग)
• याशिवाय विविध प्रकारचे मॉड्यूलर बोर्ड, थिनर, ब्लॅक टी आणि ४ वे चे नग चोरून नेले होते.
आरोपीला बेड्या:
या घटनेबाबत १५ मे २०२६ रोजी मध्यरात्री ००:३९ वाजता दापोली पोलीस ठाण्यात भारतीय न्यायसंहिता (BNS) २०२३ चे कलम ३०५(अ), ३३१(३), आणि ३३१(४) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.
गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत आकाश सुनील पवार (वय २४ वर्षे, रा. वनौशी तर्फे नातू, ता. दापोली, जि. रत्नागिरी) या आरोपीला निष्पन्न केले. दिनांक १५ मे २०२६ रोजी रात्री २१:३२ वाजता पोलिसांनी आरोपी आकाश पवार याला रीतसर अटक केली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास दापोली पोलीस करीत आहेत.