रत्नागिरी :
पूर्णगड परिसरात एसटी प्रवासादरम्यान महिलेच्या पर्समधून मंगळसूत्र चोरी झाल्याची घटना उघडकीस आली आहे. रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्यात याप्रकरणी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, कस्तुरी कैलास साळवी (वय ४३, रा. मठ कुंभारवाडी, ता. लांजा) या एसटी बसने प्रवास करत होत्या. १३ मे रोजी सकाळी ७.३० ते ९ वाजण्याच्या दरम्यान पाली एसटी स्टँड ते मुरशी साखरपा या प्रवासादरम्यान त्यांच्या पर्समध्ये ठेवलेले सोन्याचे मंगळसूत्र अज्ञात चोरट्याने लंपास केले.
फिर्यादी यांनी कपड्यांच्या पिशवीत ठेवलेल्या पर्समध्ये हे मंगळसूत्र ठेवले होते. प्रवासादरम्यान गर्दीचा फायदा घेत अज्ञात व्यक्तीने हे दागिने चोरून नेल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. चोरीस गेलेल्या मंगळसूत्राची किंमत सुमारे दीड लाख रुपये असल्याचे सांगण्यात आले.
या प्रकरणी रत्नागिरी ग्रामीण पोलिसांनी भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम ३०३(२) अन्वये गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.













