पिकुळे येथील श्री शांतादुर्गा विद्यालयाचा दहावीचा निकाल उत्कृष्ट; गुणवंत विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव!

दोडामार्ग | सुहास देसाई :पिकुळे येथील श्री शांतादुर्गा माध्यमिक विद्यालयाने यावर्षीच्या इयत्ता दहावीच्या परीक्षेत घवघवीत यश संपादन करून आपली यशाची परंपरा कायम राखली आहे. परीक्षेत उत्कृष्ट गुण मिळवून उत्तीर्ण झालेल्या, प्रथम तीन क्रमांकासह विशेष प्राविण्य मिळवलेल्या ९ गुणवंत विद्यार्थ्यांचा प्रशालेच्या वतीने शाल, श्रीफळ आणि स्मृतीचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.

या सोहळ्याला मुंबई उच्च न्यायालयाचे वकील ॲड. अनिल गवस, दोडामार्ग तालुका मुंबई विकास मंडळाचे कार्याध्यक्ष श्री. वासुदेव वर्णेकर, दोडामार्ग तालूका पत्रकार समितीचे अध्यक्ष श्री. रत्नदीप गवस, सुहास देसाई,माजी शालेय समिती सदस्य बबन गवस व शिक्षक-पालक संघाचे माजी उपाध्यक्ष महादेव नाईक व सुभाष गवस यांची प्रमुख उपस्थिती होती.

 

‘इंटरनेटच्या युगात संधीचा लाभ घ्या’ – वासुदेव वर्णेकर

 

यावेळी बोलताना दोडामार्ग तालुका मुंबई विकास मंडळाचे कार्याध्यक्ष वासुदेव वर्णेकर म्हणाले, “आम्ही अत्यंत गरिबीत आणि खडतर परिस्थितीत शिक्षण घेतले. पूर्वी ग्रामीण भागात मार्गदर्शन मिळत नव्हते, परंतु आता इंटरनेटच्या माध्यमातून ज्ञानाची सर्व दालने खुली झाली आहेत. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी बौद्धिक आणि शारीरिक सराव करत अधिक परिश्रम घेण्याची तयारी ठेवावी. समाजात मदत करणारे अनेक दाते आहेत, फक्त विद्यार्थ्यांमध्ये जिद्द असायला हवी.”

असे त्यांनी स्पष्ट केले.

 

‘नकारात्मकता सोडा, यश तुमचेच’ – ॲड. अनिल गवस

 

मुंबई उच्च न्यायालयाचे वकील ॲड. अनिल गवस यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले, “या सत्कारामागे नवी पिढी घडविण्याचे मोठे व्हिजन आहे. आजचे युग हे एआय (AI) चे आहे. तुम्ही ज्या क्षेत्रात जाल, तिथे आपल्या शाळेचे नाव उज्ज्वल करा.” त्यांनी मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आणि त्यांचे गुरु रमाकांत आचरेकर यांचे उदाहरण देत, ‘साधना आणि संस्कारांची जपणूक केल्यास यश निश्चित मिळते’ असे स्पष्ट केले. तसेच, कोकणात कशाचीही कमतरता नसून विद्यार्थ्यांनी सकारात्मक विचार ठेवून नेहमी जमिनीवर राहावे, असा सल्ला दिला.

 

‘जिल्ह्याचा जिल्हाधिकारी जिल्ह्यातीलच व्हावा’ – रत्नदीप गवस

दोडामार्ग पत्रकार समितीचे अध्यक्ष रत्नादीप गवस यांनी सांगितले की, “दहावी-बारावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांनी आता MPSC, UPSC सारख्या स्पर्धा परीक्षांकडे वळले पाहिजे. कोकणातील विदयार्थी साठी शैक्षणिक सुविधा सिंधुदुर्ग जिल्ह्यात निर्माण केल्या त्यातून भविष्यात जिल्ह्याचे भाग्यविधाते व माजी मुख्यमंत्री नारायणराव राणे साहेब यांचे स्वप्न आहे की, या जिल्ह्याचा जिल्हाधिकारी याच जिल्ह्यातील तरुण झाला पाहिजे.यासाठी गरजू होतकरू हुशार विदयार्थी यांना साद दिली आहे उत्तर भारतीय अधिकारी ज्याप्रमाणे शालेय स्तरापासून तयारी करतात, तसाच लाभ आपल्या विद्यार्थ्यांनीही घेतला पाहिजे.”

माजी विद्यार्थ्यांचे मनोगत

यावेळी प्रशालेची माजी विद्यार्थिनी भूमी गवस हिने आपले मनोगत व्यक्त करताना शिक्षक आणि पालकांच्या मेहनतीबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. खेळात सहभागी झाल्यामुळे मिळालेल्या २० गुणांच्या सवलतीचा (ग्रेस गुण) कसा फायदा झाला, हे सांगत तिने इतर विद्यार्थ्यांनाही क्रीडा व इतर स्पर्धांमध्ये भाग घेण्याचे आवाहन केले.

 

या सोहळ्या प्रसंगी न्यू इंग्लिश स्कुल प्रशाळेचे ज्येष्ठ क्रीडा शिक्षक श्री. हनुमंत सावंत, प्रशालेचे मुख्याध्यापक श्री. अशोक रामू आंबूलकर, सहाय्यक शिक्षिका सौ. पूर्वा गवस यांच्यासह शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, ग्रामस्थ आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि उपस्थितांचे आभार प्रदर्शन सौ. पूर्वा गवस यांनी केले. प्रशालेच्या या यशाबद्दल संपूर्ण पिकुळे पंचक्रोशीतून विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शक शिक्षकांचे जाहीर कौतुक होत आहे.