युवकाचा शिरगाव व देवगड शासकीय रुग्णालयात धिंगाणा

महिला डॉक्टर, रुग्ण, पोलिस कर्मचारी, सुरक्षा रक्षक व रुग्णालय कर्मचाऱ्यांना मारहाण

पोलिस व खासगी वाहनांच्या काचा फोडल्या

संशयिताविरोधात गुन्हा दाखल

देवगड : प्रतिनिधी

शिरगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात महिला वैद्यकीय अधिकाऱ्यासह तेथील कर्मचारी व रुग्णाला मारहाण करून शिवीगाळ व धमकी दिल्याप्रकरणी, तसेच देवगड ग्रामीण रुग्णालयात सुरक्षा रक्षक व देवगड पोलिस कर्मचाऱ्यांना मारहाण करून पोलिस व खासगी वाहनांचे नुकसान केल्याप्रकरणी राजा धर्मा गोरूड (वय ३३, रा. तुळशीनगर, देवगड) याच्याविरोधात दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १५ मे रोजी रात्री १० ते ११.३० वाजण्याच्या सुमारास शिरगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी डॉ. रूचा भुजंगराव भांडवले (वय २७) या रुग्णांची तपासणी करत असताना संशयित राजा गोरूड तेथे आला आणि त्याने आरडाओरडा सुरू केला. तेथील रुग्ण संतोष आरेकर याच्याकडे त्याने पैशांची मागणी केली.

यावेळी डॉ. भांडवले यांनी संशयितास शांत बसण्यास सांगितले असता, त्याने त्यांच्या अंगावर धावत जाऊन अश्लील शिवीगाळ केली व “तुम्हाला बघून घेईन” अशी धमकी दिली. या घटनेत डॉ. भांडवले यांच्या मदतीसाठी सरसावलेले आरोग्य कर्मचारी साईल रामटेके यांच्यासह डॉ. भांडवले यांच्यावर संशयिताने दगडफेक केली.

याप्रकरणी डॉ. रूचा भांडवले यांनी देवगड पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून संशयित राजा गोरूड याच्याविरोधात शासकीय कर्तव्यात अडथळा निर्माण करून धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा तपास पोलिस उपनिरीक्षक संतोष भालेराव करत आहेत.

दुसऱ्या घटनेत, १६ मे रोजी रात्री १ ते पहाटे ४ वाजण्याच्या दरम्यान देवगड ग्रामीण रुग्णालयात संशयित राजा गोरूड याने देवगड पोलिस ठाण्याचे हवालदार गणपती मारुती गावडे तसेच त्यांच्यासोबत असलेले पोलिस कॉन्स्टेबल चालक विश्वास पाटील व पोलिस कॉन्स्टेबल रविंद्र महाले यांना शासकीय कर्तव्य बजावत असताना मारहाण केली.

यामध्ये संशयिताने विश्वास पाटील यांच्या पाठीवर लाथा मारून दुखापत केली, तर रविंद्र महाले यांना हाताने मारहाण करून शिवीगाळ केली. तसेच पोलिस कर्मचाऱ्यांना “बघून घेतो” अशी धमकी देत रुग्णालयातील सुरक्षा रक्षक नाटेकर यांच्या अंगावर झाडाची कुंडी फेकून मारली.

यानंतर संशयिताने पोलिस वाहनासह तेथे उभ्या असलेल्या एका खासगी वाहनाच्या काचा फोडून नुकसान केले.

या प्रकरणी पोलिस हवालदार गणपती गावडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संशयित राजा गोरूड याच्याविरोधात भारतीय न्याय संहिता कलम १३१, १३२, ३२४(३), ३५१(२)(३), ३५२ तसेच महाराष्ट्र पोलिस अधिनियम कलम ११०, १११, ११७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक सुप्रिया बंगडे करत आहेत.