चिपळूण (वार्ताहर):
तालुक्यातील कळमुंडी गावचे सुपुत्र आणि उमरोली येथील रहिवासी डॉ. राजरत्न राष्ट्रपाल सावंत यांनी वैद्यकीय क्षेत्रात उल्लेखनीय यश संपादन केले आहे. त्यांनी आष्टा (सांगली) येथील अण्णासाहेब डांगे आयुर्वेद मेडिकल कॉलेजमधून ‘एम.डी. पंचकर्म’ ही पदव्युत्तर पदवी प्रथम श्रेणीमध्ये उत्तीर्ण केली आहे. चिपळूणमधील प्रसिद्ध कवी, साहित्यिक व डॉ. आंबेडकर वाचनालयाचे अध्यक्ष राष्ट्रपाल भागुराम सावंत आणि सौ. आकांक्षा सावंत यांचे ते सुपुत्र आहेत. त्यांच्या या यशाबद्दल संपूर्ण तालुक्यातून त्यांचे कौतुक होत आहे.
डॉ. राजरत्न यांनी २०२१ मध्ये कोल्हापूरमधून बी.ए.एम.एस. (BAMS) पदवी घेतली होती. त्यानंतर त्यांनी ई.एम.एस. व सी.सी.एच. पदविका पूर्ण केल्या असून, सध्या त्यांची ‘फेलोशिप इन इंटरनल मेडिसिन’ सुरू आहे.
त्यांचे प्राथमिक शिक्षण जि. प. केंद्रशाळा तनाली, माध्यमिक शिक्षण वसंतराव भागवत विद्यालय मार्गताम्हाणे, तर उच्च माध्यमिक शिक्षण सह्याद्री शिक्षण संस्थेच्या सती-चिंचघरी येथून झाले आहे.
वैद्यकीय शिक्षणासोबतच डॉ. राजरत्न यांना वाचन, सूत्रसंचालन (निवेदन), गायन, अभिनय आणि दिग्दर्शनाची विशेष आवड आहे.
वडील राष्ट्रपाल सावंत यांच्या सामाजिक व धार्मिक कार्याचा वारसा पुढे चालवत, ‘रुग्णसेवा’ आणि ‘सामाजिक क्षेत्रात’ स्वतःला झोकून देण्याचा राजरत्न यांचा मानस आहे.
आई-वडील, शिक्षक आणि प्राध्यापकांकडून मिळालेल्या सततच्या प्रोत्साहनामुळेच हे यश मिळवता आल्याची भावना डॉ. राजरत्न यांनी व्यक्त केली.
त्यांच्या या यशाबद्दल लोकमान्य टिळक स्मारक वाचनालय, डॉ. बाबासाहेब आंबेडकर वाचनालय आणि चिपळूण तालुका बौद्धजन हितसंरक्षक समितीसह विविध सामाजिक-शैक्षणिक संस्थांच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.













