देवरूख (प्रतिनिधी)
संगमेश्वर तालुक्यातील करंजारी गावचे प्रगतीशील शेतकरी श्री. राजेश रवींद्र हेगीष्टे व श्री. सागर रवींद्र हेगीष्टे बंधूंनी यावर्षी आयोजित करण्यात आलेल्या देशस्तरीय ‘मिलांज आंबा महाराजा’ आंबा प्रदर्शन व स्पर्धेमध्ये सर्वोत्कृष्ट हापूस आंबा फळ विभागात प्रथम क्रमांकाचे मानाचे पारितोषिक पटकावून करंजारी गावासह संपूर्ण संगमेश्वर तालुक्याचे नाव उंचावले आहे.
दि. १५ ते ३१ मे २०२६ दरम्यान आयोजित करण्यात आलेल्या या प्रतिष्ठेच्या प्रदर्शनात देशभरातील नामांकित आंबा उत्पादकांनी सहभाग घेतला होता. अत्यंत दर्जेदार, आकर्षक व उत्कृष्ट गुणवत्तेच्या रत्नागिरी हापूस आंब्यामुळे हेगीष्टे बंधूंना हा बहुमान प्राप्त झाला. या यशाबद्दल क्रांती व्यापारी संघटना देवरुखतर्फे त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन व पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा व्यक्त करण्यात आल्या आहेत. *या उल्लेखनीय यशामुळे संगमेश्वर तालुक्यातील हापूस उत्पादक शेतकऱ्यांमध्ये नवे चैतन्य निर्माण झाले असून अधिकाधिक उत्कृष्ट प्रतीचा रत्नागिरी हापूस आंबा उत्पादनासाठी शेतकरी प्रेरित होत आहेत.
रत्नागिरी हापूस हा केवळ फळ नसून कोकणच्या कष्टकरी शेतकऱ्यांच्या मेहनतीचे, जिद्दीचे आणि गुणवत्तेच्या परंपरेचे प्रतीक आहे. तालुक्यातील शेतकऱ्यांच्या अथक परिश्रमातून निर्माण होणारा हा हापूस जगभरातील ग्राहकांना चव, सुगंध आणि तृप्तीचा आनंद देत राहणार असल्याची ही गौरवास्पद पोचपावती मानली जात आहे. या यशामुळे तालुक्यातील आंबा उत्पादनाला चार चांद लागले असून करंजारी गावच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. परिसरातील तरुण शेतकरी व आंबा उत्पादकांसाठी हेगीष्टे बंधूंचे यश प्रेरणादायी ठरत आहे.














