देवरूख कनिष्ठ महाविद्यालयाच्या ‘एनएसएस श्रमसंस्कार निवासी शिबिरा’चा सोनवडे येथे प्रारंभ

संस्थेच्या शतकपूर्ती वर्षानिमित्त विशेष कार्यक्रम व उपक्रमांचे आयोजन

देवरूख (प्रतिनिधी):

देवरूख शिक्षण प्रसारक मंडळाच्या आठल्ये-सप्रे-पित्रे महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्यावतीने ‘नशामुक्त एवं टी.बी. मुक्त युवा’ या संकल्पनेवर आधारित सात दिवसीय निवासी श्रमसंस्कार शिबिराचा प्रारंभ माध्यमिक विद्यालय, सोनवडे, ता. संगमेश्वर येथे झाला आहे. देवरुख शिक्षण प्रसारक मंडळाच्या शतकपूर्ती वर्षाच्या निमित्ताने या निवासी शिबिरामध्ये विशेष कार्यक्रम व उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

श्रमसंस्कार शिबिराच्या उद्घाटन समारंभाला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नरेंद्र तेंडोलकर, कनिष्ठ महाविद्यालय शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा सौ. सुजाता प्रभुदेसाई, कार्यक्रमाच्या उद्घाटक ग्रामपंचायत प्रशासक अमृता नरोटे, संस्थाध्यक्ष प्रभाकर सनगरे, सहसचिव सीमा खेडेकर, अनंत जोशी, मुख्याध्यापक शिवाजी बंडगर, अंकुश राऊत आणि ग्रामपंचायत अधिकारी तृप्ती मोहिरे आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या स्वागताने करण्यात आली. यावेळी पारंपरिक नैसर्गिक फुलांऐवजी विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या ओरिगामीच्या आकर्षक कागदी फुलांनी मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. याप्रसंगी सोनवी घडघडी परिसर शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष प्रभाकर सनगरे यांची संगमेश्वर तालुका शिक्षण संस्था चालक संघटनेचे अध्यक्ष म्हणून निवड झाल्याबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नरेंद्र तेंडोलकर यांच्या हस्ते शाल व पुष्पगुच्छ देऊन त्यांना गौरविण्यात आले. कार्यक्रमाचे उद्घाटन पारंपरिक दीपप्रज्वलनाऐवजी मान्यवरांच्या हस्ते रोपट्याला पाणी घालून करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. डॉ. मयुरेश राणे यांनी केले. त्यांनी शिबिराची उद्दिष्टे, संकल्पना आणि सात दिवसांच्या कालावधीत राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती दिली.

महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नरेंद्र तेंडोलकर यांनी आपल्या मनोगतातून शिबिरासाठी शुभेच्छा दिल्या. राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासाबरोबरच त्यांच्यामध्ये सामाजिक जाणीव, श्रमप्रतिष्ठा आणि सेवाभाव निर्माण होतो, असे त्यांनी नमूद केले. तसेच विद्यार्थ्यांनी या शिबिरातील विविध उपक्रमांमध्ये उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावे, असे आवाहन केले. यानंतर सुजाता प्रभुदेसाई यांनीही आपल्या मनोगतातून शिबिरार्थीना शुभेच्छा दिल्या. त्यांनी विद्यार्थ्यांनी शिबिराच्या माध्यमातून मिळणाऱ्या अनुभवांचा उपयोग आपल्या वैयक्तिक विकासासाठी आणि समाजाच्या हितासाठी करावा, असे आग्रही मत व्यक्त केले. तृप्ती मोहिरे यांनी शिबिराच्या आयोजनाबद्दल आनंद व्यक्त करून, उपस्थित स्वयंसेवकांना शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाच्या उद्घाटक अमृता नरोटे यांनी आपल्या मनोगतातून उपस्थित विद्यार्थ्यांनी व्यसनमुक्तीचा संदेश समाजापर्यंत पोहोचवून निरोगी आणि जागरूक समाजनिर्मितीसाठी योगदान द्यावे, असे आवाहन त्यांनी याप्रसंगी केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षीय समारोप प्रभाकरजी सनगरे यांनी करताना विद्यार्थ्यांनी या सात दिवसांच्या कालावधीत शिस्त, एकता, श्रमप्रतिष्ठा आणि समाजसेवेची भावना जोपासावी,असे आवाहन केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. स्वप्नाली झेपले यांनी केले. या उद्घाटन कार्यक्रमाला संदीप भोसले, कलाशिक्षक विष्णू परीट, प्रा. धनंजय दळवी, आशा सेविका सौ. देवयानी चव्हाण तसेच ग्रामपंचायतीचे आजी-माजी सदस्य, माध्यमिक विद्यालय सोनवडेचे शिक्षकवृंद, ग्रामस्थ आणि राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी कार्यक्रमाधिकारी प्रा. सीमा कोरे, प्रा. डॉ. मयुरेश राणे, प्रा. स्वप्नाली झेपले, प्रा.अभिनय पातेरे आणि प्रा. वसंत तावडे परिश्रम घेत आहेत. संस्थेच्या शतकपूर्ती वर्षात आयोजित या श्रमसंस्कार शिबिराच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये समाजसेवेची भावना, पर्यावरणप्रेम, श्रमप्रतिष्ठा आणि सामाजिक जबाबदारीची जाणीव अधिक दृढ होण्यास निश्चितच मदत होणार आहे.