कुवारबावच्या उतारात झाला अपघात; डंपर चालकाचे पलायन
रत्नागिरी ः प्रतिनिधी
शहरातील कुवारबाव रस्त्यावर डंपर व कारचा अपघात झाला. या अपघातामध्ये कारमधील तीघे जखमी झाले. उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघाताची ही घटना शनिवार 16 मे रोजी रात्रीच्या सुमारास घडली.
फिर्यादी शैलेंद्र दत्ताराम कांबळे (३९, रा. एसटी कॉलनी, रत्नागिरी) हे व त्यांची दोन मुलं आदित्य व सलोनी असे कार ( एमएच-०८- एएक्स- ५२०४) ने शुक्रवार 15 मे रोजी आपल्या मुळ गावी नांदगाव-चिपळूण येथे गेले होते. तेथून परत येत असताना शनिवारी रात्री कुवारबाव रस्त्यावरील उतारात डंपरने जोरदार धडक दिली. या मध्ये ते स्वतः व दोन मुलं जखमी झाली. उपचारासाठी तिघांनाही जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल कऱण्यात आली आहे. डंपर चालकाने घटनास्थळावरुन पलायन केले. या प्रकरणी जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या पोलिस चौकीत अपघाताची नोंद करण्यात आली आहे. अधिक तपास शहर पोलिस करत आहेत.












