रत्नागिरी ः प्रतिनिधी
शहरातील आठवडा बाजार येथे दुकान बंद करत असताना आमचे कपडे घेणारे ग्राहक का तोडता अशी विचारणा केल्याच्या रागातून तीन जणांनी लोखंडी सळी डोक्यात मारुन दुखापत केली. या प्रकरणी दोघा संशयितांविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पप्पू आणि सुरेश (दोघांचेही पुर्ण नाव माहित नाही. रा. साळवी स्टॉप, चिरायु हॉस्पिटल जवळ, रत्नागिरी ) असे संशयित आहेत. ही घटना शनिवार १६ मे रोजी रात्री 10 वा.सुमारास आठवडा बाजार येथे घडली. फिर्यादी अनिल विसंबर यादव (३०, रा. कुसमी, तहसील नवगड, जि. सिद्धार्थनगर, उत्तर प्रदेश. सध्या. रा. कोकणनगर, रामचंद्र कदम यांच्याकडे भाड्याने, रत्नागिरी) यांनी आठवडा बाजार येथे कपडे विक्रीचे दुकान लावले होते. रात्री दुकान बंद करीत असताना फिर्यादी यांचे समोर लावलेले कपड्याचे दुकानातील संशयित दोघांना फिर्यादी यांनी आमचे कपडे घेणारे ग्राहक का तोडता असा प्रश्न केला. याचा राग मनात धरुन संशयितांना दुकानातील लोखंडी सळ्या हातात घेवून फिर्यादी अनिल यादव याच्या डोक्यावर मारुन दुखापत केली. सोडवा सोडव करण्यासाठी आलेल्या साक्षिदारालाही मारहाण केली. या प्रकरणी अनिल यादव यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.













