सहकाऱ्यावरच चोरीचा गुन्हा दाखल
मंडणगड: ऑफिसच्या खर्चासाठी टेबलाच्या ड्रॉवरमध्ये ठेवलेली ५७,००० रुपयांची रोख रक्कम लबाडीच्या इराद्याने चोरून नेल्याची धक्कादायक घटना धुत्रोली येथील ‘अक्षय कन्स्ट्रक्शन’ कंपनीत घडली आहे. याप्रकरणी कंपनीतीलच एका कर्मचाऱ्यावर मंडणगड पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी सुनील बसान्ना गुत्तेदार (वय २७ वर्षे, रा. धुत्रोली, ता. मंडणगड) हे ‘अक्षय कन्स्ट्रक्शन’मध्ये कार्यरत आहेत. त्यांनी कंपनीच्या क्रेशन डिपार्टमेंटच्या किरकोळ खर्चासाठी लागणारे ५७,००० रुपये ऑफिसमधील क्रेशन डिपार्टमेंटच्या रूममध्ये असलेल्या टेबलाच्या ड्रॉवरमध्ये ठेवून दिले होते. दिनांक १६ मे २०२६ रोजी रात्री ११.०० वाजेपासून ते १७ मे २०२६ रोजी सकाळी ०९.०० वाजण्याच्या दरम्यान आरोपी मनीषकुमार चंचल (सध्या रा. धुत्रोली, मूळ रा. सराय पकवान) याने स्वतःच्या फायद्यासाठी हे पैसे ड्रॉवरमधून चोरून नेले.
ड्रॉवरमधील पैसे गायब झाल्याचे लक्षात आल्यानंतर फिर्यादी यांनी मंडणगड पोलीस ठाण्यात रीतसर तक्रार दिली. त्यानुसार १८ मे २०२६ रोजी रात्री २१.२३ वाजता आरोपी मनीषकुमार चंचल याच्याविरुद्ध भारतीय न्यायसंहिता (BNS) अधिनियम २०२३ च्या कलम ३०६ अन्वये गुन्हा रजिस्टर नंबर ५५/२०२६ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.













