मंडणगडमध्ये शिवसेनेला बळ; नगरसेवक सुभाष सापटे यांचा रामदासभाई कदम यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश

मंडणगड प्रतिनिधी
मंडणगड नगरपंचायतीतील राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते तथा नगरसेवक सुभाष सापटे यांनी शिवसेना नेते रामदासभाई कदम यांच्या प्रमुख उपस्थितीत जामगे येथे झालेल्या कार्यक्रनात शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. यावेळी त्यांनी शिवसेनेचे निवडणूक चिन्ह धनुष्यबाण हाती घेत गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त केला. सुभाष सापटे यांच्या पक्षप्रवेशामुळे मंडणगड शहराच्या राजकीय वर्तुळात नव्या चर्चांना सुरुवात झाली आहे.
विशेष म्हणजे, काही दिवसांपूर्वीच सुभाष सापटे यांनी चिपळूण येथे भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पक्षात प्रवेश केला होता. त्यानंतर आता त्यांनी शिवसेनेत प्रवेश केल्याने त्यांच्या राजकीय भूमिकेची चर्चा सुरू झाली आहे.
शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर बोलताना सुभाष सापटे म्हणाले, “गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या नेतृत्वाखाली मी आणि माझे सहकारी मंडणगड तालुक्याच्या विकासासाठी खांद्याला खांदा लावून काम करू. तसेच शिवसेनेची ताकद अधिक बळकट करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करू,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
या पक्षप्रवेशावेळी उद्योजक संदेश चिले, कल्पेश शिंदे, दिनेश कांबळे आणि प्रवीण दिवेकर यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. शिवसेना नेते रामदासभाई कदम यांनी सुभाष सापटे व त्यांच्या सहकाऱ्यांचे पक्षात स्वागत केले. मंडणगड तालुक्यात शिवसेनेचे संघटन अधिक मजबूत करण्यासाठी सर्वांनी एकजुटीने काम करण्याचे आवाहन त्यांनी केले.
सुभाष सापटे यांच्या शिवसेना प्रवेशामुळे मंडणगड नगरपंचायत क्षेत्रातील राजकीय समीकरणांवर त्याचा परिणाम होण्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. आगामी नगरपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा पक्षप्रवेश महत्त्वाचा मानला जात असून स्थानिक राजकारणात पुढील काळात आणखी कोणत्या राजकीय घडामोडी घडतात, याकडे लक्ष लागले आहे.