३० जूनपर्यंत अर्ज सादर करण्याचे आवाहन
कुडाळ :
पथविक्रेता (उपजीविकेचे संरक्षण व पथविक्री विनियमन) अधिनियम, २०१४ तसेच महाराष्ट्र पथविक्रेता नियम, २०१६ अन्वये कुडाळ नगरपंचायतीकरिता पथविक्रेता तक्रार निवारण व विवाद निर्णय समिती स्थापन करण्यात येत आहे. या समितीवर सदस्य म्हणून नियुक्तीसाठी पात्र व इच्छुक व्यक्तींकडून अर्ज मागविण्यात आले आहेत.
या समितीमध्ये अध्यक्ष म्हणून दिवाणी न्यायाधीश किंवा न्यायदंडाधिकारी दर्जाच्या व्यक्तीची नियुक्ती करण्यात येणार असून, त्यांच्यासह दोन सदस्यांचा समावेश असेल. सदस्यपदासाठी अर्जदाराचे वय ३५ ते ६५ वर्षांदरम्यान असणे आवश्यक आहे. तसेच मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी धारण केलेली असावी आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमधील कामाचा अनुभव असावा.
याशिवाय सामाजिक कार्य, नागरी प्रशासन किंवा पथविक्रेत्यांशी संबंधित विषयांबाबत किमान दहा वर्षांचा अनुभव असलेल्या व्यक्तींनाच सदस्यपदासाठी पात्रता राहणार आहे.
पात्र व इच्छुक व्यक्तींनी आवश्यक कागदपत्रांसह आपले अर्ज दि. ३० जून २०२६ पूर्वी मुख्याधिकारी, कुडाळ नगरपंचायत यांच्याकडे सादर करावेत. अधिक माहितीसाठी इच्छुकांनी कार्यालयीन वेळेत कुडाळ नगरपंचायत कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन नगरपंचायतीतर्फे करण्यात आले आहे.













