तालुक्यातील सुमारे १२५ हून अधिक विक्रेत्यांचा आंदोलनात सहभाग
सावंतवाडी । प्रतिनिधी : अखिल भारतीय औषधी विक्रेता संघटनेने पुकारलेल्या देशव्यापी बंदला सावंतवाडी तालुक्यात शंभर टक्के प्रतिसाद मिळाला आहे. तालुक्यातील सुमारे १२५ हून अधिक औषध विक्रेत्यांनी काल मध्यरात्री १२ वाजल्यापासून या आंदोलनात सहभाग घेतला असून, आज मध्यरात्रीपर्यंत सर्व औषध दुकाने कडेकोट बंद राहणार आहेत. गेल्या काही दिवसांपासून हाताला काळी फीत बांधून व्यवसाय करणाऱ्या औषध विक्रेत्यांनी आज थेट दुकाने बंद ठेवून प्रशासनाचा तीव्र निषेध नोंदवला.
प्रमुख मागण्या आणि आंदोलन: ऑनलाईन औषधविक्रीवर तात्काळ बंदी आणावी, कॉर्पोरेट कंपन्यांकडून दिली जाणारी अव्यवसायिक सवलत (डिस्काउंट) बंद करावी, तसेच २८.०८.२०१८ आणि २६.०३.२०२० रोजी जारी करण्यात आलेल्या जाचक अधिसूचना मागे घेण्यात याव्यात, या प्रमुख मागण्यांसाठी हे देशव्यापी आंदोलन पुकारण्यात आले आहे. “बनावट औषधांपासून देशाला वाचवा” अशी आग्रही मागणी या आंदोलनाद्वारे केंद्र सरकारकडे करण्यात आली आहे.
रुग्णांचे हाल; आपत्कालीन परिस्थितीसाठी विशेष व्यवस्था: सावंतवाडी शहर आणि ग्रामीण भागातील सर्वच्या सर्व १२५ मेडिकल स्टोअर्स बंद राहिल्यामुळे औषध खरेदीसाठी आलेल्या रुग्णांच्या नातेवाईकांची मोठी गैरसोय झाली. अनेकांना रिकाम्या हाताने माघारी परतावे लागले. मात्र, रुग्णांची ही गैरसोय लक्षात घेऊन आणि आपत्कालीन परिस्थितीत औषध पुरवठा खंडित होऊ नये यासाठी औषध विक्रेता संघटनेकडून विशेष पर्यायी व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच, कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीला तोंड देण्यासाठी अन्न व औषध प्रशासन (FDA) देखील पूर्णपणे सज्ज असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.













