पावसाळ्यापूर्वीच सावंतवाडीच्या ग्रामीण भागात वीज पुरवठ्याचा बोजवारा

पाच दिवसांत सुधारणा न झाल्यास महावितरणवर धडक मोर्चाचा

स्वराज्य सरपंच सेवा संघाचा इशारा

​सावंतवाडी । प्रतिनिधी :
पावसाळा सुरू होण्यापूर्वीच सावंतवाडी तालुक्यातील ग्रामीण भागात वीज पुरवठ्याचा अक्षरशः बोजवारा उडाला आहे. यामुळे नागरिकांमध्ये महावितरण प्रशासनाविरोधात संतापाची तीव्र लाट उसळली आहे. तालुक्यातील कास, मडुरा, पाडलोस, निगुडे, रोणापाल, शेर्ले आणि सातोसे परिसरात गेल्या आठ ते दहा दिवसांपासून दिवसातून किमान एकदा तरी तासन्तास वीज पुरवठा खंडित होत असल्याने ग्रामस्थ कमालीचे त्रस्त झाले आहेत. येत्या पाच दिवसांत हा वीज पुरवठा सुरळीत न झाल्यास महावितरण कार्यालयावर धडक मोर्चा काढत तीव्र आंदोलन छेडू, असा इशारा स्वराज्य सरपंच सेवा संघ सावंतवाडी तालुकाध्यक्ष तथा कासचे सरपंच प्रवीण पंडित यांनी दिला आहे.

​ वीज खंडित झाल्यानंतर महावितरणच्या संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता नागरिकांना समाधानकारक उत्तरे मिळत नाहीत. उलट त्यांच्याकडून उद्धट वागणूक दिली जात असल्याचा गंभीर आरोप सरपंच प्रवीण पंडित यांनी केला आहे. भरमसाठ वीज बिले वसुलीसाठी महावितरणचे कर्मचारी वेळेवर येतात, मग वीज पुरवठा सुरळीत ठेवण्यास टाळाटाळ का होते, असा संतप्त सवाल त्यांनी उपस्थित केला. पावसाळ्यापूर्वीचे पाच-सहा महिने अधिकाऱ्यांना दुरुस्तीची अजिबात आठवण येत नाही आणि मे महिना सुरू झाला की देखभाल-दुरुस्तीच्या नावाखाली तासन्तास वीज बंद ठेवली जाते. यामुळे सर्वसामान्य नागरिकांना प्रचंड मानसिक आणि आर्थिक त्रास सहन करावा लागत असल्याचे सांगत, ग्रामीण भागातील वीज प्रश्न तातडीने न सुटल्यास व्यापक जनआंदोलन उभे राहील, असा इशारा पंडित यांनी दिला आहे.

​ महावितरणकडून दर मंगळवारी देखभालीच्या नावाखाली दिवसभर वीज पुरवठा खंडित केला जातो, मात्र प्रत्यक्षात कोणती आणि कशी देखभाल केली जाते, असा सवाल उपस्थित करत ग्रामस्थांनी महावितरणच्या संपूर्ण कामकाजावरच प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. विजेच्या सततच्या या लपंडावामुळे शेतकरी, व्यापारी, विद्यार्थी आणि सर्वसामान्य नागरिकांचे मोठे आर्थिक व शैक्षणिक नुकसान होत आहे. सध्या पावसाळा तोंडावर असतानाच ही दुरवस्था असेल, तर ऐन मुसळधार पावसात तालुक्यात काय परिस्थिती ओढवणार, अशी तीव्र भीती आता ग्रामस्थांमधून व्यक्त केली जात असून महावितरणने यावर तातडीने तोडगा काढावा, अशी मागणी केली जात आहे.