सावंतवाडी । प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यात सध्या रक्ताचा मोठ्या प्रमाणात तुटवडा भासत आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत, आज सावंतवाडी येथे ‘युवा रक्तदाता संघटना’ आणि ‘महेंद्र ॲकॅडमी’ यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराला रक्तदात्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
जिल्ह्यात सध्या विविध रुग्णालयांमध्ये उपचार घेत असलेल्या रुग्णांना आणि रक्ताअभावी रखडलेल्या शस्त्रक्रियांना या शिबिरामुळे मोठा दिलासा मिळणार असल्याचे मत ओरोस जिल्हा रुग्णालय रक्तपेढीचे अधिकारी साई सावंत यांनी व्यक्त केले. तसेच अडचणीच्या काळात नेहमीच धावून येणाऱ्या युवा रक्तदाता संघटनेचे त्यांनी विशेष आभार मानले.
याप्रसंगी युवा रक्तदाता संघटनेचे संस्थापक अध्यक्ष तथा नगरसेवक श्री. देव्या सूर्याजी, डॉ. संदीप सावंत, ओरोस जिल्हा रुग्णालय रक्तपेढीचे अधिकारी साई सावंत व त्यांची टीम, सावंतवाडी रक्तपेढी तंत्रज्ञ सौ. प्राजक्ता रेडकर, महेंद्र ॲकॅडमीचे महेंद्र पेडणेकर, ॲड. स्वप्निल कोलगावकर, ॲड. संकेत नेवगी, मिहिर मठकर, प्रतीक कोरगावकर, प्रशांत कामत उपस्थित होते.
तसेच युवा रक्तदाता संघटनेचे सल्लागार ॲड. प्रसाद नाटेकर, सचिव वसंत सावंत, ॲड. प्रथमेश प्रभू, दिग्विजय मुरगोड, देवेश पडते, भास्कर आमुणेकर, गुरुप्रसाद गवळी, आर्यन आमुणेकर, अजय भोजवीया आणि महेंद्र ॲकॅडमीच्या विद्यार्थी-विद्यार्थिनींनी स्वतः उपस्थित राहून रक्तदान केले.
ओरोस येथील जिल्हा रुग्णालय रक्तपेढीत रक्ताचा साठा अत्यंत कमी आहे. त्यामुळे जिल्ह्यातील इतर सामाजिक संस्थांनीही पुढाकार घेऊन रक्तदान शिबिरे आयोजित करावीत आणि रुग्णांचे प्राण वाचवण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन नगरसेवक श्री. देव्या सूर्याजी यांनी यावेळी केले.













