दोडामार्ग | सुहास देसाई :पावसाळा तोंडावर आल्याच्या पार्श्वभूमीवर दोडामार्ग तहसील कार्यालयात अत्यंत महत्त्वपूर्ण अशी मान्सूनपूर्व आपत्ती व्यवस्थापन नियोजन बैठक संपन्न झाली. “ही केवळ नावापुरती आढावा बैठक नसून, आगामी पावसाळ्यात निर्माण होणाऱ्या संभाव्य पूर व अन्य आपत्तींना सर्व यंत्रणा आणि नागरिक कसे सामोरे जाणार, याचे चोख नियोजन करण्यासाठी आहे. यामध्ये एकही कुटुंब सुटले नाही पाहिजे,” अशा कडक सूचना तहसीलदार राहुल गुरव यांनी बैठकीत दिल्या. मात्र, या बैठकीत विविध गावांतील सरपंच आणि लोकप्रतिनिधींनी प्रशासनाच्या ढिसाळ कारभारावर बोट ठेवत आक्रमक भूमिका घेतली.
केवळ आश्वासने नको, थेट कृती करा: सरपंचांची मागणी
बैठकीत कुडासे, मणेरी, आयी, साटेली भेडशी, खोक्रल, झरेबाबर आणि आडाळी येथील सरपंचांनी स्थानिक समस्यांचा पाढा वाचला. कुडासे उपसरपंच प्रसाद कुडासकर यांनी सांगितले की, पूर काळात मोठे नुकसान कुडासे नळपाणी योजनेचे कारण विहीर नदीत आहे व पाणी भरल्याने मोटार पंप दुरुस्ती खर्च होतो हा ग्रामपंचायतीला करावा लागतो. पावसाळ्यात वीज गायब झाल्यावर ही योजना ठप्प होते. तसेच गावात केवळ ३ जॅकेट उपलब्ध असून एकही होडी (नाव) उपलब्ध नसल्याने पूरपरिस्थितीत बचावकार्य कसे करणार, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
परमे आणि घोटगे गावांना जोडणाऱ्या पुलावर दरवर्षी पाणी येत असल्याने गावाचा संपर्क तुटतो. येथील १५ घरांना मोठा धोका असून, घोटगे येथील जुने मातीचे घर कोसळण्याची शक्यता आहे. आश्वासन देऊनही दरवर्षी पावसाळ्यापूर्वी येथील पाणी बंद होणार, यावर काहीही ठोस कार्यवाही झालेली नाही. त्यामुळे “आता फक्त सूचना देऊन चालणार नाही, थेट कार्यवाही व्हावी,” अशी आक्रमक मागणी सरपंचांनी केली.
अधिकारी मुख्यालयी राहत नसल्याने संताप
तिलारी धरण परिसरातील आणि पूर व्यवस्थापन विभागाचे जबाबदार अधिकारी क्षेत्रात उपस्थित राहत नसल्याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली. “पूर व्यवस्थापन अधिकारी जाग्यावर उपलब्ध नसतात. महसूल विभागासह तिलारी धरण क्षेत्रातील संबंधित अधिकाऱ्यांनी पावसाळ्याचे तीन महिने अनिवार्यपणे मुख्यालयी थांबले पाहिजे,” अशी मागणी लोकप्रतिनिधींनी लावून धरली. आडाळीचे सरपंच पराग गावकर यांच्याशी संपर्क होत नसल्याने तेथील बैठकीचे नियोजन रखडल्याचेही समोर आले.
नदीपात्रातील गाळ आणि पाणीपुरवठ्याचा प्रश्न
मणेरी गावात नदी पात्र मोठे आहे तर आयी गावातील नदीपात्र लहान असल्याने नदीकाठच्या चार वाड्यांना पुराचा मोठा धोका निर्माण होतो. नदीपात्रातील गाळ तात्काळ काढण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली.
नदी काठी असलेल्या मणेरी गावात नदीपात्रात पाणीपुरवठा विहीर असल्याने पूरपरिस्थितीत नागरिकांना पिण्याचे शुद्ध पाणी मिळत नाही. तसेच येथील विद्युत पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी तात्काळ वायरमन उपलब्ध करून देण्याची मागणी झाली.
गेल्या वर्षी मणेरी, बडवेवाडी आणि खालचा बाजार येथे पूरग्रस्तांसाठी योग्य व्यवस्था नाही, येथील हायस्कूलही बंद असल्याने अडचण निर्माण झाली होती याकडे लक्ष वेधण्यात आले आहे
महत्त्वाच्या मागण्या व प्रशासनाचे आश्वासन
साटेली भेडशी येथील सार्वजनिक विहीर नदीपात्रात असल्याने तिला तात्काळ संरक्षक भिंत बांधून देण्यात यावी, अशी मागणी ग्रामसेविका डोगरदिवे यांनी केली
गेल्या वर्षी दरड कोसळून नुकसानी झाली होती त्या ठिकाणी झोळंबे येथे संरक्षक भिंत बांधण्यात आली असून, मागेली येथील रस्त्याचे काम अपूर्ण आहे, त्यामुळे गैरसोय होत आहे अन्य समस्या बाबत त्याची तहसीलदार स्वतः पाहणी करणार असल्याचे सांगितले आहे
आरोग्य व रुग्णवाहिका: आपत्ती व्यवस्थापन कालावधीत
रुग्णवाहिकेवर (Ambulance) २४ तास ड्रायव्हर उपलब्ध असणे गरजेचे आहे. आपत्कालीन परिस्थितीसाठी ७५५८६७३४६८ हा मोबाईल क्रमांक जारी करण्यात आला असून, सर्व संबंधित अधिकारी आणि सरपंचांना व्हॉट्सॲप ग्रुपवर ॲड होण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
‘कार्यवाही करण्याची वेळ प्रशासनावर येऊ देऊ नका’बैठकीच्या शेवटी लोकप्रतिनिधींनी आवाहन केले की, “आपत्तीच्या काळात जनता नेहमीच सहकार्य करते. परंतु अशा वेळी सर्व लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांनी हजर राहून एकमेकांना सहकार्य केले पाहिजे. प्रशासनाने लोकहिताची कामे वेळेत पूर्ण करावीत, आमच्यावर आंदोलनाची किंवा पुढील कार्यवाही करण्याची वेळ येऊ देऊ नये.
आजच्या महत्त्वपूर्ण बैठकीला तहसीलदार राहुल गुरव, गटविकास अधिकारी (BDO) अजिंक्य सावंत, सभापती पार्वती गवस, उपसभापती तथा तालुकाप्रमुख गणेशप्रसाद गवस, भाजप तालुकाध्यक्ष तथा जिल्हा परिषद सदस्य दीपक गवस, जिल्हा परिषद सदस्या श्वेता धरणे,सौ. तळवणेकर पंचायत समिती सदस्या सायली स्वप्नील निंबाळकर, सदस्य संजय सातार्डेकर, दोडामार्ग नगराध्यक्ष चेतन चव्हाण, राजेंद्र निंबाळकर, तेजस देसाई, अनिल शेटकर, पराशर सावंत, देवेंद्र शेटकर यांच्यासह तालुक्यातील सर्व सरपंच, पोलीस पाटील आणि ग्रामसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते













