मांगवली येथे उद्या ‘किसान गोष्टी’ व पशुपालक शेतकरी मेळाव्याचे आयोजन

वैभववाडी l प्रतिनिधी :     शेतकरी आणि पशुपालकांच्या सर्वांगीण विकासासाठी व त्यांना आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती व्हावी, यासाठी कृषि तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) कृषि विभाग वैभववाडी, पंचायत समिती वैभववाडी आणि सामाजिक वनीकरण वैभववाडी यांच्या संयुक्त विद्यमाने वैभववाडी तालुक्यात ‘किसान गोष्टी’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

हा विशेष मेळावा ३० ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी १०:३० वाजता ‘सुवर्णसिंधु गिर गोशाळा, मौजे मांगवली (संसारेवाडी)’ येथे पार पडणार आहे.

या मेळाव्यात कृषी व पशुसंवर्धन क्षेत्रातील तज्ज्ञ मार्गदर्शन करणार आहेत.

चारा पिकांची लागवड व त्याविषयीचे नियोजन करणे, दुग्धव्यवसायात अत्यंत महत्त्वाच्या असणाऱ्या चारा पिकांच्या लागवडीबाबत शास्त्रीय माहिती, पशुपालक व शेतकऱ्यांसाठी उपलब्ध असलेल्या विविध शासकीय अनुदान योजनांची सविस्तर माहित, जनावरांचे शास्त्रीय व आधुनिक पद्धतीने संगोपन व व्यवस्थापन कसे करावे, याबाबत तज्ज्ञांचे मार्गदर्शन होणार आहे.

या शेतकरी मेळाव्याला सभापती श्री. सिद्धेश रावरणे, जिल्हा परिषद सदस्य श्री. प्रमोद रावरणे, सौ. श्रावणी रावरणे, सौ. रिद्धी सुतार यांच्यासह सर्व पंचायत समिती सदस्य, आत्मा समिती सदस्य, सर्व ग्रामपंचायतींचे सरपंच, इतर लोकप्रतिनिधी आणि विविध दूध संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत.

तालुक्यातील पशुपालक शेतकरी व नागरिकांनी या मेळाव्याला मोठ्या संख्येने उपस्थित राहून, तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाचा आणि विविध योजनांच्या माहितीचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन आत्मा समितीचे अध्यक्ष श्री. मंगेश प. कदम आणि तालुका कृषि अधिकारी श्री. निरंजन देशमुख यांनी केले आहे.