सावंतवाडीत ‘मिशन रेबीज’तर्फे पथनाट्य आणि बाहुल्यांच्या खेळाद्वारे जनजागृती

संशयित कुत्रा आढळल्यास हेल्पलाईनवर संपर्क साधण्याचे आवाहन

सावंतवाडी । प्रतिनिधी : शहरासह परिसरात भटक्या कुत्र्यांची वाढती संख्या आणि त्यांच्याकडून होणारे वाढते हल्ले या पार्श्वभूमीवर, ‘मिशन रेबीज’ संस्थेच्या वतीने सावंतवाडीत दोन दिवसीय विशेष जनजागृती मोहीम राबवण्यात आली. शनिवारी सावंतवाडी बस स्थानक आणि त्यानंतर सावंतवाडी बाजारपेठ येथे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या मोहिमेला स्थानिक नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

रेबीज या जीवघेण्या आजाराविषयी लोकांमध्ये जागृती निर्माण करण्यासाठी संस्थेच्या टीमने पारंपरिक पद्धतीचा वापर न करता, पथनाट्य आणि बाहुल्यांच्या खेळाचे सादरीकरण केले. या माध्यमातून बाजारपेठेतील व्यावसायिक, ग्राहक आणि पादचाऱ्यांचे लक्ष वेधून घेण्यात आले. अतिशय सोप्या आणि रंजक भाषेतून रेबीज आजाराची भीषणता नागरिकांसमोर मांडण्यात आली.

नागरिकांना थेट मार्गदर्शन आणि माहितीपत्रकांचे वाटप

या कार्यक्रमादरम्यान संस्थेच्या प्रतिनिधींनी नागरिकांना रेबीज संदर्भात सविस्तर मार्गदर्शन केले. यामध्ये प्रामुख्याने रेबीज आजार कसा होतो आणि त्याचा प्रसार कसा रोखावा?

स्वतःचे व आपल्या कुटुंबाचे या आजारापासून संरक्षण कसे करावे?

कुत्रा किंवा इतर कोणताही प्राणी चावल्यास तात्काळ कोणती प्रथमोपचार व वैद्यकीय काळजी घ्यावी याबाबतची महत्त्वपूर्ण माहिती देण्यात आली. तसेच नागरिकांना भविष्यात संदर्भासाठी उपयुक्त ठरावी अशी माहितीपत्रकेही (पॅम्पलेट्स) यावेळी वाटण्यात आली.

*२०३० पर्यंत सिंधुदुर्ग जिल्हा ‘रेबीजमुक्त’ करण्याचा संकल्प*

‘मिशन रेबीज’ ही संस्था गेल्या अनेक वर्षांपासून सावंतवाडी, दोडामार्ग आणि वेंगुर्ला तालुक्यांमध्ये भटक्या व पाळीव प्राण्यांचे रेबीज प्रतिबंधात्मक लसीकरण करण्याचे मोठे काम करत आहे.

या प्रसंगी बोलताना संस्थेचे शिक्षण अधिकारी अमित नाईक म्हणाले, “येत्या २०३० पर्यंत संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्हा रेबीजमुक्त करण्याचे आमचे उद्दिष्ट आहे. हे उद्दिष्ट नागरिकांच्या सक्रिय सहभागाशिवाय पूर्ण होऊ शकत नाही. त्यामुळे प्रत्येकाने स्वतः जागरूक राहून इतरांनाही याबाबत साक्षर करावे.”

हेल्पलाईन नंबर जारी

संस्थेच्या वतीने नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे की, परिसरात कुठेही रेबीज संक्रमित किंवा संशयित कुत्रा अथवा प्राणी आढळून आल्यास नागरिकांनी तात्काळ ७७४४०२९५८६ या मिशन रेबीजच्या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.