भव्य ग्रंथदिंडीने मालवण नगरी साहित्यिक चैतन्याने दुमदुमली!

डॉ. सुभाष मधुकर दिघे यांच्या हस्ते शुभारंभ; उत्स्फूर्त प्रतिसादात रंगला ग्रंथदिंडीचा सोहळा!

साहित्यिक, साहित्यप्रेमी, विद्यार्थी आणि लोककलावंतांच्या सहभागातून साहित्य व संस्कृतीचा संगम!

बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित दोन दिवसीय सिंधुदुर्ग जिल्हा युवा साहित्य संमेलनाला उत्साहात प्रारंभ

अमित खोत | मालवण : ज्ञानाचा दीप प्रज्वलित करीत, साहित्याचा जागर घडवीत आणि मराठी भाषेच्या अस्मितेचा अभिमान जागवीत निघालेल्या भव्य ग्रंथदिंडीने मालवण नगरी साहित्यिक चैतन्याने दुमदुमून गेली. ग्रंथांच्या पालखीतून ज्ञानाचा वारसा, तर उत्स्फूर्त सहभागातून साहित्य आणि संस्कृतीचे वैभव अधोरेखित झाले.

 

साहित्यिक, साहित्यप्रेमी, शिक्षक, विद्यार्थी आणि लोककलावंतांच्या उत्स्फूर्त सहभागातून साहित्य व संस्कृतीचा सुरेख संगम अनुभवायला मिळाला. पारंपरिक वेशभूषा, साहित्यिक संदेश देणारे फलक आणि ग्रंथांविषयीची आत्मीयता अशा चैतन्यमय वातावरणात सिंधुदुर्ग जिल्हा युवा साहित्य संमेलनाचा दिमाखात प्रारंभ झाला.

 

बॅरिस्टर नाथ पै सेवांगण, मालवण यांच्या वतीने आयोजित ‘सिंधुदुर्ग जिल्हा युवा साहित्य संमेलन – २०२६’ शनिवार, २८ व रविवार, २९ नोव्हेंबर रोजी धुरीवाडा येथील बॅरिस्टर नाथ पै सेवांगण येथे संपन्न होत आहे. या दोन दिवसीय संमेलनाचा प्रारंभ शनिवारी मालवण शहरात भव्य ग्रंथदिंडी काढून करण्यात आला. मालवण भरड येथील श्री दत्त मंदिराच्या प्रांगणात ज्येष्ठ डॉक्टर सुभाष मधुकर दिघे यांच्या हस्ते ग्रंथपूजन करून ग्रंथदिंडीचा शुभारंभ करण्यात आला.

 

भरड येथून बाजारपेठ, फोवकांडा पिंपळमार्गे धुरीवाडा येथील सेवांगणच्या संमेलनस्थळापर्यंत ही ग्रंथदिंडी काढण्यात आली. पारंपरिक अब्दागिरी, साहित्यिक संदेश देणारे विविध फलक तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नामवंत साहित्यिकांच्या कार्याची ओळख करून देणारे माहितीफलक हे ग्रंथदिंडीचे विशेष आकर्षण ठरले. साहित्याचा समृद्ध वारसा, मराठी भाषेची अस्मिता आणि वाचन संस्कृतीचे महत्त्व अधोरेखित करणाऱ्या या ग्रंथदिंडीतून मालवणच्या सांस्कृतिक वैभवाचे दर्शन घडले.

 

ग्रंथदिंडीतून वाचन संस्कृतीचा जागर!

 

ग्रंथदिंडीच्या माध्यमातून वाचन संस्कृतीचा संदेश देत साहित्य, भाषा आणि विचारांचा समृद्ध वारसा जपण्याचा संकल्प अधोरेखित करण्यात आला. तरुण पिढीमध्ये वाचनाची आवड निर्माण करणे, नवोदित लेखक व कवींना हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून देणे आणि साहित्याच्या माध्यमातून नव्या विचारांना दिशा देणे, हा या संमेलनाचा प्रमुख उद्देश आहे. डिजिटल युगातही पुस्तकांचे महत्त्व अबाधित असल्याचा संदेश या ग्रंथदिंडीतून देण्यात आला. ग्रंथ हे ज्ञानाचे अक्षय भांडार असून व्यक्तिमत्त्व घडविण्याबरोबरच समाजाला वैचारिक दिशा देण्याचे सामर्थ्य साहित्यात आहे, ही भावना यावेळी व्यक्त झाली.

 

या ग्रंथदिंडीत सेवांगणचे अध्यक्ष ॲड. देवदत्त परुळेकर, साहित्यिक प्रवीण बांदेकर, कार्यवाह लक्ष्मीकांत खोबरेकर, शैलेश खंडाळेकर, सौ. ज्योती तोरसकर, डॉ. सुमेधा नाईक, सिंधुदुर्ग महाविद्यालयाचे प्राचार्य कैलास राबते, ज्येष्ठ पत्रकार राजेंद्र खंडाळेकर, ज्येष्ठ पत्रकार नंदकिशोर महाजन, उद्योजक डॉ. दीपक परब, बलराम सामंत, प्रा. नागेश कदम, ग्रंथपाल संजय शिंदे, ग्रंथापाल ऋतुजा केळकर, प्रा. एम. आर. खोत यांच्यासह साहित्यिक, साहित्यप्रेमी, लोककलावंत, विविध शाळांचे शिक्षक आणि विद्यार्थी मोठ्या उत्साहाने सहभागी झाले होते.

 

‘माझा काळ, माझी भूमिका’ या संकल्पनेतून साहित्याचा वैचारिक उत्सव!

 

‘माझा काळ, माझी भूमिका’ या मध्यवर्ती संकल्पनेवर आधारित या दोन दिवसीय साहित्य संमेलनात ग्रंथदिंडी, कविसंमेलने, परिसंवाद, मुलाखती, विविध साहित्यिक व सांस्कृतिक कार्यक्रम तसेच विद्यार्थी आणि युवकांसाठी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. नव्या पिढीच्या साहित्यिक अभिव्यक्तीला प्रोत्साहन देत त्यांच्या विचारांना व्यापक व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न या संमेलनातून केला जात आहे. साहित्य आणि संस्कृतीचा समृद्ध वारसा लाभलेल्या मालवणच्या भूमीत रंगणारे हे संमेलन जिल्ह्यातील साहित्यप्रेमी, विद्यार्थी, शिक्षक आणि नवोदित साहित्यिकांसाठी प्रेरणादायी व वैचारिक पर्व ठरणार आहे.