शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नांवर आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांच्याशी चर्चा

प्राजक्त चव्हाण यांची भेट; शिवछत्रपती शिक्षक संघटनेच्या सिंधुदुर्ग जिल्हा कार्यकारिणीची घोषणा

स्वप्निल कदम l कुडाळ :

शिक्षकांच्या विविध प्रलंबित प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी आणि त्यांच्या न्याय्य मागण्यांचा शासनदरबारी पाठपुरावा करण्याच्या अनुषंगाने कोकण विभाग शिक्षक मतदारसंघाचे आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांची शिवसेना कुडाळ-मालवण विधानसभा प्रमुख (अ.जा.) प्राजक्त चव्हाण यांनी कणकवली येथील शासकीय विश्रामगृहात भेट घेतली. यावेळी शिक्षकांच्या समस्या, प्रलंबित मागण्या तसेच शैक्षणिक क्षेत्रातील विविध विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.

 

शिक्षकांच्या प्रश्नांना संघटितपणे व्यासपीठ मिळावे आणि त्यांच्या मागण्यांचा प्रभावीपणे पाठपुरावा व्हावा, या उद्देशाने महाराष्ट्र राज्य शिवछत्रपती शिक्षक संघटनेच्या माध्यमातून जिल्हास्तरावर संघटनात्मक बांधणी करण्यात येत आहे. याच अनुषंगाने संघटनेच्या सिंधुदुर्ग जिल्हा कार्यकारिणीची घोषणा करण्यात आली.

 

यामध्ये जिल्हाध्यक्षपदी अविनाश परीट, उपाध्यक्षपदी सतीश तवटे, तर सचिवपदी सुभाष खरात यांची निवड करण्यात आली. या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून जिल्ह्यातील शिक्षकांचे प्रश्न संघटितपणे मांडण्यासह त्यांच्या मागण्यांचा पाठपुरावा करण्यात येणार आहे.

 

यावेळी संघटनेचे कानडे सर, वेंगुर्लेकर सर, सर्व तालुकाध्यक्ष व विविध पदाधिकारी उपस्थित होते. तसेच कणकवली तालुका मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष चोडणकर सर यांचीही उपस्थिती होती.

 

आगामी काळात जिल्हा व तालुकास्तरावर शिक्षक कार्यकारिणीची बांधणी करून संघटनेचे कार्य अधिक व्यापक करण्यात येणार आहे. शिक्षकांचे प्रलंबित प्रश्न, सेवा विषयक अडचणी आणि शैक्षणिक क्षेत्रातील विविध मागण्या शासनापर्यंत पोहोचविण्यासाठी संघटना सक्रियपणे काम करणार असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले.