वेंगुर्ले : दाजी नाईक
रविवार २४ मे रोजी पहाटे शिरोडा केरवाडी समुद्रात वादळीवाऱ्या पावसामुळे मासेमारी करण्यासाठी गेलेली मासेमारी बोट समुद्राच्या मोठ्या लाटांच्या तडाख्यात बुडाली. यात केरवाडी येथील राजन राघोबा सारंग (वय ४५) हे पाण्यात बेपत्ता झाले होते. त्यांचा मृतदेह आज तिसऱ्या दिवशी वेंगुर्ले वायंगणी समुद्र किनारी सकाळी ६ वाजण्याच्या सुमारास आढळून आला आहे.
पहिल्या दिवशी प्रमाणे काल दुसऱ्या दिवशी ही वेंगुर्ले तालुक्यातील संपूर्ण किनारपट्टीवर द्रोण आणि होड्यांच्या सहाय्याने शोध घेण्यात आला पण त्यांचा काही थांगपत्ता लागलेला नाही.
शिरोडा केरवाडी येथील नितीन तुकाराम गोकरणकर यांची मच्छीमारी बोट मासेमारीसाठी सारंग कुटुंबीयांनी चालवायला घेतली होती. श्री देवी पावणाई असे या बोटीचे नाव असून रविवारी सकाळी मच्छीमारीसाठी जात असताना ही बोट समुद्रात बुडाली. या बोटीवर होडीचे चालक प्रकाश सारंग व त्यांचा मुलगा दाजी सारंग आणि समुद्राच्या पाण्यात बुडून बेपत्ता झालेले राजन सारंग होते. प्रकाश आणि दाजी सारंग हे सुदैवाने या दुर्घटनेतून बचावले. तर तेथील ग्रामस्थांनी बुडालेली होडी सुद्धा तात्काळ जाऊन बाहेर काढली.
दरम्यान राजन सारंग बुडाल्याने सारंग कुटुंबावर मोठा घाव बसला आहे.
दरम्यान राजन यांचा सर्वत्र शोध सुरू होता. आज त्यांचा मृतदेह आढळून आला आहे. पोलिस पंचनामा करून पुढील कारवाई करणार आहेत.











