चार चार रेल्वे स्टेशन असूनही लांजा तालुक्यातील रेल्वे प्रवासी वाऱ्यावर

मुख्यमंत्र्यांच्या पत्राकडेही दुर्लक्ष, रेल्वे अधिकाऱ्यांची उदासीन भूमिका

संतोष कोत्रे
लांजा:– कोकणातून जाणाऱ्या कोकण रेल्वेचा कोकणातील माणसांना आणि विशेषतः लांजा तालुक्यातील प्रवासी जनतेला फारसा फायदा होत नाही, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. याचे कारण म्हणजे लांजा तालुक्यात निवसर, आडवली, वेरवली आणि विलवडे अशी चार चार रेल्वे स्टेशन असतानाही प्रवाशांना मात्र एक्सप्रेस रेल्वे गाड्यांसाठी रत्नागिरी येथे जावे लागते. अपवाद विलवडे रेल्वे स्टेशनचा ( या ठिकाणी कोकणकन्या आणि तुतारी एक्सप्रेस थांबतात) अशा प्रकारे चारचार रेल्वे स्टेशन असतानाही तालुक्यातील प्रवासी जनतेच्या पदरी उपेक्षाच पडते आहे. याशिवाय या रेल्वे स्टेशनवर अन्य सेवा सुविधांची वानवाच आहे.कोकण रेल्वे प्रवासी संघटनेने याबाबत रेल्वे अधिकाऱ्यांशी वारंवार पत्र व्यवहार करूनही याकडे दुर्लक्ष करण्यात आलेले आहे. दस्तूरखुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील विलवडे रेल्वे स्टेशनवर, मांडवी एक्सप्रेस, नेत्रावती एक्सप्रेस आणि जनशताब्दी एक्सप्रेस या गाड्यांना थांबा मिळावा या संदर्भात रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांना पत्र दिलेले असतानाही त्याबाबत कार्यवाही झालेले नाही. अशाप्रकारे चार चार रेल्वे स्टेशन असतानाही तालुक्यातील प्रवाशांना मात्र त्याचा काहीही फायदा होत नसल्याचे चित्र आहे.
कोकण रेल्वेचे शिल्पकार प्रा. मधु दंडवते यांच्यामुळे कोकण रेल्वेचे स्वप्न साकार झाले. त्यानंतर हळूहळू लांजा तालुक्यात निवसर, आडवली, विलवडे आणि वेरवली ही चार रेल्वे स्टेशन तयार झाली. त्यामुळे साहजिकच लांजा तालुक्यातील मुंबईकर प्रवासी चाकरमानी यांच्या आशा पल्लवीत झाल्या होत्या. मात्र सद्यस्थिती पाहिली तर या चार चार रेल्वे स्टेशनचा तालुक्यातील प्रवासी जनतेला किती फायदा होतो? त्या ठिकाणी प्रवाशांच्या दृष्टीने कोणकोणत्या सुविधा सोयी उपलब्ध आहेत? विलवडे रेल्वे स्टेशन सोडले तर उर्वरित तीनही स्टेशनवर दिवा पॅसेंजर व्यतिरिक्त एकही गाडी थांबत नाही. मग चार चार रेल्वे स्टेशन उभारण्याचा फायदा तो काय?
तालुक्यातील अन्य तीन रेल्वे स्टेशनच्या तुलनेत विलवडे रेल्वे स्टेशनवर प्रवाशांची नेहमीच गर्दी असते. कारण लांजा आणि राजापूर तालुक्यातील प्रवाशांसाठी विलवडे रेल्वे स्टेशन हे मध्यवर्ती ठिकाण असल्याने या ठिकाणी या दोन्ही तालुक्यातील मुंबई-पुणे चाकरमान्यांची नेहमीच वर्दळ असते. लांजा तसेच राजापूर तालुक्यातील ५० ते ६० गावातील प्रवासी या रेल्वे स्टेशनवरून प्रवास करत असतात. यामध्ये राजापूर तालुक्यातील अनुस्कुरा घाटातून प्रवासी विलवडे येथे येत असतो. तसेच ओणी, तिवंदामाळ, वाटुळ, सह अन्य गावे तर लांजा तालुक्यातील वाकेडसह पूर्व भागातील खोरनिनको, भांबेड, प्रभानवलि सह अन्य गावे या ५० ते ६० गावांमधील रहिवाशी मुंबई पुणे येथे जाण्यासाठी जाण्याकरिता मोठ्या प्रमाणात कोकण रेल्वे वापर करतात. मात्र या रेल्वे स्टेशनवर अपडाऊन अशा कोकणकन्या, तुतारी आणि सावंतवाडी दिवा पॅसेंजर या तीनच ट्रेन थांबतात. त्यामुळे वरील गावातील प्रवासी वर्गाला ८० ते १०० किमी चा प्रवास करून रत्नागिरी रेल्वे स्टेशन गाठावे लागते. त्यामुळे वेळ आणि पैसा अधिक खर्च करावा लागतो . हा प्रवास त्यांच्यासाठी त्रासदायक ठरतो.
लांजा व राजापूर तालुक्यातील सर्वाधिक प्रवासी प्रवास करणाऱ्या या विलावडे रेल्वे स्टेशनवर अनेक गैरसोई आहेत. यामध्ये ज्येष्ठ व दिव्यांग प्रवाशांना प्लॅटफॉर्मवर येण्यासाठी लिफ्टची व्यवस्था करणे, प्लॅटफॉर्म क्रमांक दोन पक्का बांधण्यात यावा ,प्लॅटफॉर्म क्रमांक दोन वर जाण्या येण्यासाठी पादचारी पूल बांधण्यात यावा, मोकळ्या प्लॅटफॉर्मवर पत्रा शेड उभारून पेयर ब्लॉक बसवावे, संपूर्ण प्लॅटफॉर्मवर विद्युत दिवे आणि पंख्यांची व्यवस्था करणे,, विश्रामगृह प्लॅटफॉर्मला जोडून बांधणे आदी मागण्या यापूर्वी कोकण रेल्वे प्रवासी संघटना मुंबई ग्रामीण यांच्यावतीने करण्यात आल्या आहेत. मात्र त्याला देखील रेल्वे अधिकाऱ्यांकडून केराची टोपली दाखवण्यात आली आहे.
विलवडे रेल्वे स्टेशनवर प्रवाशांची संख्या लक्षात घेता इथे मांडवी,जनशताब्दी ,नेत्रावती या गाड्यांना इथे थांबा मिळावा हि इथल्या प्रवाशांची मागणी आहे. ‘विलवडे रेल्वे प्रवासी संघटना मुंबई व ग्रामीण ही यासाठीप्रयत्न करते आहे. मात्र रेल्वे अधिकाऱ्यांच्या उदासीन भूमिकेमुळे अद्यापही याबाबत कार्यवाही झालेली नाही. अशाप्रकारे तालुक्यात चार चार रेल्वे स्टेशन असतानाही एक्सप्रेस गाड्यांसाठी लांजा तालुक्यातील प्रवाशांना रत्नागिरी गाठावी लागत आहे, हीच खरी तालुक्यातील रेल्वे प्रवाशांची अगतिकता आणि शोकांतिका आहे. कोकण रेल्वे कोकणातून सुरू झाली मात्र तिचा लाभ आमच्या तालुक्यातील प्रवाशांना कधी मिळणार ? याचे उत्तर सध्या तरी अनुत्तीर्ण आहे.