शिरगाव हायस्कूलच्या १९८०-८१ एस.एस.सी. बॅचचा स्नेहमेळावा उत्साहात

शाळा नूतनीकरणासाठी दीड लाख रुपयांच्या देणगीची घोषणा

शिरगाव,( प्रतिनिघी ):   शिरगाव हायस्कूलच्या सन १९८०-८१ च्या एस.एस.सी. बॅचचा स्नेहमेळावा रविवारी उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. तब्बल १२ वर्षांनंतर सर्व वर्गमित्र व मैत्रिणी पुन्हा मातृसंस्थेच्या सान्निध्यात एकत्र आल्याने कार्यक्रमाला भावनिक रंग चढला.

या वेळी माजी विद्यार्थ्यांनी शाळेच्या इमारत नूतनीकरणासाठी एका वर्गाच्या नूतनीकरणाकरिता दीड लाख रुपयांची देणगी जाहीर केली. ही रक्कम येत्या जुलै महिन्यात संस्थेकडे सुपूर्द करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.

कार्यक्रमाची सुरुवात संस्थापक कै. पु. अं. कर्ले साहेब यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. “एकात्मता गीत”, प्रार्थना व पसायदानाने वातावरण भक्तिमय झाले.

कार्यक्रमात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या माजी विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. जुन्या आठवणींना उजाळा देताना अनेकांचे मन भारावून गेले.

स्नेहमेळावा यशस्वी करण्यासाठी संभाजी साटम, ॲड. प्रकाश जाधव, विनायक साटम व शैलजा साटम यांनी विशेष परिश्रम घेतले.

या प्रसंगी ज्येष्ठ शिक्षक व्ही. बी. ऐनापुरे सर, विजयकुमार कदम सर, मुख्याध्यापक एस. एन. आत्तार सर, संस्थेचे उपाध्यक्ष गणपत तावडे साहेब, संभाजी साटम, ॲड. प्रकाश जाधव, विनायक साटम, तुकाराम जाधव, अंकुश मेस्त्री, श्रीमती तावडे तसेच इतर वर्गमित्र व मैत्रिणी उपस्थित होते.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन अँड प्रकाश जाधव यांनी केले.