आमदार शेखर निकम यांच्याकडे देवरूखवासियांची धाव
देवरूख (प्रतिनिधी)
रत्नागिरी जिल्ह्यात नव्या कोऱ्या ‘राजमाता जिजाऊ’ बस गाड्या दाखल झाल्यानंतर संपूर्ण जिल्ह्यात उत्साहाचे वातावरण असतानाच, देवरुखकरांच्या नशिबी मात्र पुन्हा एकदा घोर निराशा आली आहे. नव्या गाड्या फक्त रत्नागिरी आगाराच्या पदरात पडल्याने, गंभीर बस टंचाईशी झुंज देणाऱ्या देवरुख आगाराला केवळ आश्वासनांची खैरात मिळाली आहे. एसटी प्रशासनाच्या या दुटप्पी भूमिकेमुळे देवरुख परिसरात तीव्र संताप व्यक्त होत असून, अखेर संतप्त ग्रामस्थांनी थेट आमदार शेखर निकम यांच्याकडे धाव घेत जाब विचारला आहे.
देवरुख आगारामध्ये सध्या बसची प्रचंड कमतरता, कर्मचाऱ्यांचा तुटवडा आणि जीर्ण झालेल्या डेपो इमारतीमुळे वाहतूक सेवा अक्षरशः व्हेंटिलेटरवर आहे. अनेक महत्त्वाच्या फेऱ्या अचानक बंद झाल्याने विद्यार्थी, रुग्ण आणि ग्रामीण भागातील प्रवाशांचे अतोनात हाल होत आहेत. या अन्यायाविरोधात देवरुखात “एक सही – देवरुख आगारासाठी” ही मोहीम राबवून आधीच मोठी लोकचळवळ उभी राहिली आहे. त्यातच नव्या गाड्यांबाबत देवरुखला डावलण्यात आल्याने ग्रामस्थांचा संयम सुटला आणि नुकतीच देवरुखात एक आणीबाणीची बैठक पार पडली.
या बैठकीनंतर ग्रामस्थांच्या एका आक्रमक शिष्टमंडळाने थेट आमदार शेखर निकम यांची भेट घेतली आणि देवरुख आगाराच्या दुरवस्थेचा पाढा वाचला. “नव्या गाड्या रत्नागिरीला आणि देवरुखकरांना फक्त पोकळ आश्वासने का?” असा संतप्त सवाल यावेळी करण्यात आला. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून आमदार शेखर निकम यांनी जागेवरच विभाग नियंत्रकांना दूरध्वनीवरून संपर्क साधला आणि प्रशासनाला धारेवर धरले. देवरुख आगाराची कोंडी तातडीने फोडण्याची तंबी आमदारांनी दिली. आमदारांच्या आक्रमक पवित्र्यानंतर आणि ग्रामस्थांच्या रोषानंतर, विभाग नियंत्रकांनी देवरुख आगाराला १२ नवीन बस गाड्या देण्याचे तसेच रिक्त वाहन चालक पदे तातडीने भरण्याचे आश्वासन दिले आहे. या महत्त्वपूर्ण आणि वादळी चर्चेवेळी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष रोहन बने, धडाडीचे सामाजिक कार्यकर्ते युयुत्सु आर्ते, निखिल कोळवणकर, नगरसेवक प्रफुल्ल भुवड आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते. यांच्यासह देवरुखाती बैठकीला संतोष लाड, बापु गांधी, निवे बु मधील एस टी प्रेमी गजानन राजवाडे आदी उपस्थित होते.












