ग्रामस्थांच्या पुर्नवसनाचा प्रस्तावावर अद्याप कोणतीच कार्यवाही नाही
नरेंद्र मोहिते राजापूर:
शहरानजीकच्या धोपेश्वर गावातील खंडेवाडीत दरडग्रस्त भागात पावसाळयात होणाऱ्या अतिवृष्टीत दरड कोसळुन ग्रामस्थांच्या जीवाला निर्माण होणारा धोका टाळण्यासाठी शासनाकडून या ग्रामस्थांच्या पुर्नवसनाचा पर्याय निवडण्यात आला आहे. यासाठी पाच एकर जागाही स्थानिक ग्रामस्थांनीच उपलब्ध करून देण्याचे मान्य केलेले आहे. मात्र या आपदग्रस्तांचे पुर्नवसन करण्याबाबत शासनाकडे पाठविण्यात आलेल्या प्रस्तावात अनेक त्रुटी काढुन त्याच्या पुर्ततेसाठी शासनस्तरावरून तो परत पाठविण्यात आल्याने खंडेवाडीतील ग्रामस्थांच्या पुर्नवसनाचा प्रश्न लटकला आहे. त्यामुळे यावर्षीही अतिवृष्टीत खंडेवाडतील ग्रामस्थांना जीव मुठीत घेऊन रहावे लागणार आहे. तर प्रशासनाला ग्रामस्थांच्या जीवाला निर्माण होणारा धोका लक्षात घेता यावर्षीही या ग्रामस्थांचे अतिवृष्टीकाळात तात्पुरत्या स्वरूपात स्थलांतर करावे लागणार आहे.
दरवर्षी पावसाळा आला की प्रशासनाकडून नैसर्गिक आपत्ती आराखडे तयार केले जातात, मग त्यावर उपाययोजनांचे नियोजन केले जाते. मात्र दरवर्षी तीच तीच गावे आपत्ती व्यवस्थापन यादीत येतात. त्यामुळे अशा आपदग्रस्त गावांमध्ये ठोस उपायोजनांची आवश्यकता असल्याची बाब अधोरेखित झालेली आहे.
राजापूर शहरानजीक असलेल्या धोपेश्वर गावातील खंडेवाडी हा भाग वर्ग-दोन जास्त ते मध्यम धोकादायक गाव म्हणून भूवैज्ञानिक सर्वेक्षण पथक पुणे यांनी घोषीत केले आहे. खंडेवाडीतील ग्रामस्थांच्या घराशेजारचा भाग दि.22 व 23 जुलै 1989 च्या अतिवृष्टीने धोकादायक झाल्यामुळे सदर वाडीतील ग्रामस्थांना सन 1989 मध्ये तात्पुरते स्थलांतरीत करणेत आले होते. तेव्हापासून हा भाग आपदग्रस्त म्हणून गणला जात आहे. या ठिकाणी एकूण 27 घरे ही दरड प्रवण क्षेत्रात असून त्यांची लोकसंख्या ही 245 इतकी आहे. दरवर्षी पावसाळयात अतिवृष्टीच्या काळात या सर्व ग्रामस्थांचे शहरात श्री मंगल कार्यालय अथवा रानतळे येथील इंग्लीश मेडिअम स्कुल या ठिकाणी प्रशासनाकडून स्थलांतर केले जाते.
या ठिकाणी दरवर्षी पावसाळयात निर्माण होणारी आपत्ती आणि करावे लागणारे स्थलांतर याचा विचार करून या कुटुंबांचे पुर्नवसन करण्याचा पर्याय प्रशासनाने निवडला आहे. पुनर्वसन करणेकामी संबंधित ग्रामस्थांची जिल्हाधिकारी रत्नागिरी यांनी दि. 24/08/2021 चे पत्रात नमुद केल्याप्रमाणे माहिती संकलित करण्यात आली आहे. तसेच त्यांचे पुनर्वसनकामी मौजे धोपेश्वर खंडेवाडी येथील ग्रामस्थ श्री. बांदिवडेकर यांनी नं. 17/1 ही त्यांचे मालकीची 5 एकर जागा मोबदला घेऊन पुनर्वसनासाठी जागा निश्चित करणेत आली आहे. बांदिवडेकर यांनी त्याबाबतचे संमतीपत्र राजापूर तहसीलदार कार्यालयाकडे सादर केलेले आहे.
राजापूर तहसीलदार कार्यालयाकडून पुर्तता करून हा पुर्नवसनाचा प्रस्ताव जिल्हाधिकारी यांच्याकडे सादर करण्यात आला होता. तर जिल्हाधिकारी यांच्याकडून सदरचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आला होता.
मात्र शासनाकडून या प्रस्तावात अनेक त्रुटी काढुत तो परत जिल्हाधिकारी यांच्याकडे पुर्ततांसाठी पाठविण्यात आला आहे. यामध्ये या गावाचे पुनर्वसन हे शासकिय जागेवर करण्यात येणार आहे की खाजगी जागेवर याचा उल्लेख नाही. या गावात आत्तापर्यंत नागरी सुविधे कामासाठी एकूण किती खर्च करण्यात आला आहे, याचा तपशिल सादर करण्यात आला नाही, या गावात मिटिगेशनच्या अनुषंगाने च्या अनुषंगाने आत्तापर्यंत कोणकाणत्या उपाययोजना करण्यात आल्या व त्याकरीता आत्तापर्यंत किती खर्च करण्यात आला आहे. यातही मिटिगेशन च्या मोजमापासाठी कोणत्या गाईडलाइन्स आहेत त्या अंतर्गत कोणकोणती कामे केली आहेत त्याचा सदर प्रस्तावात उल्ल्लेख नाही. हे गाव भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण विभागाला गाव/वाडी कोणत्या वर्गवारी मध्ये येत असल्याचे नमुद केले नाही. पुनर्वसनाची योजना तयार करताना बाधित लोकांचे उपजिवीकेवर पुनर्वसनामुळे नकारात्मक प्रभाव असेल तर प्रभावाच्या सौम्यीकरणाचे उपाय जिल्हा आपत्ती व्यवस्थापण प्राधिकरण यांच्या प्रस्ताव समावेश केलेला नाही. सदर करावयाच्या पुनर्वसित गावात पुरवावयाच्या नागरी सुविधेसाठी तसेच पुनर्वसित गावठाणासाठी एकूण खर्चाचा तपशिल जोडलेला नाही. अशा अनेक त्रुटी काढून शासनाकडून हा प्रस्ताव परत पाठविण्यात आला आहे.
जिल्हाधिकारी यांनी उपरोक्त नमूद त्रुटीच्या अनुषंगाने परिपूर्ण माहीत कारणमिमांसेसह व नागरी सुविधांच्या कामाचे अंदाजपत्रक तांत्रिक मान्यतेसह तथा आपल्या स्वयंस्षष्ट अभिप्रायासह शासनास सादर करावे असे लेखी कळविण्यात आले आहे.
मात्र याबाबत स्थानिक प्रशासनासह जिल्हा प्रशासनाकडूनही गेल्या चार ते पाच वर्षात कोणतीच कार्यवाही झालेली नाही. त्यामुळे आता यावर्षीही धोपेश्वर खंडेवाडीतील ग्रामस्थांना आपला जीव मुठीत घेऊन रहावे लागणार आहे. प्रशासनाकडून दरवर्षी प्रमाणे यावर्षीही स्थलांतराचा पर्याय निवडला जाणार आहे.
शासनाकडून या पुर्नवसन प्रस्तावाबाबत एकूणच काढण्यात आलेल्या त्रुटी पहाता, त्याची प्रशासन कशा प्रकारे पुर्तता करते व पुन्हा परिपुर्ण प्रस्ताव शासनाकडे कधी पाठवते यावरच खंडेवाडीतील ग्रामस्थांचे पुर्नवसन अवलंबून आहे. त्यामुळे यावर्षीच्या अतिवृष्टीतही खंडेवाडीतील ग्रामस्थांना जीव मुठीत घेऊन या परिसरात वावरावे लागणार आहे. तर प्रशासनाला पुन्हा एकदा या ग्रामस्थांचे पावसाळयात तात्पुरत्या स्थलांतराची तयारी करावी लागणार आहे एवढे मात्र नक्की.
Home महत्वाच्या बातम्या धोपेश्वर खंडेवाडीतील आपदग्रस्तांना यावर्षीच्या पावसाळयातही करावे लागणार स्थलांतर













