देवरूख (प्रतिनिधी):
डिजिटल युगात ऑनलाईन चोरांचा सुळसुळाट वाढला असून संगमेश्वरमध्ये एका किराणा व्यावसायिकाला सायबर चोरांनी मोठा आर्थिक फटका दिला आहे. बँक ऑफ इंडिया (शाखा संगमेश्वर) मधून अज्ञात आरोपीने फिर्यादी आणि त्यांच्या पत्नीच्या बँक खात्यातून तब्बल २,१४,१४८ रुपये ऑनलाईन पद्धतीने चोरून फसवणूक केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी तौफिक जिकर मेमन (वय ३९ वर्षे, व्यवसाय- किराणा दुकान, रा. नावडी, संगमेश्वर). यांचे संगमेश्वर येथील बँक ऑफ इंडियाच्या शाखेत खाते आहे. अज्ञात आरोपीने काहीतरी आमिष दाखवून किंवा सायबर क्लृप्त्यांचा वापर करून तौफिक यांच्या बँक खात्यातून ८९,१४९/- रुपये आणि त्यांची पत्नी फौजिया तौफिक मेमन यांच्या बँक खात्यामधून १,२४,९९९/- रुपये असे एकूण २,१४,१४८/- रुपये ऑनलाईन ट्रान्सफर करून लंपास केले. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच मेमन यांनी पोलिसांत धाव घेतली.
या प्रकरणी संगमेश्वर पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरुद्ध भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३ चे कलम ३१८(४) आणि माहिती तंत्रज्ञान अधिनियम २००० चे कलम ६६ (सी) प्रमाणे गुन्हा रजिस्टर नंबर ६१/२०२६ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अद्याप आरोपीला अटक झालेली नसून पोलीस पुढील तपास करत आहेत. कोणत्याही अनोळखी व्यक्तीला आपला बँक OTP, पिन (PIN) किंवा पासवर्ड शेअर करू नका.
बँकेकडून किंवा लॉटरी लागल्याचे सांगणारे फेक कॉल्स आणि मेसेजपासून सावध राहा. सायबर फसवणूक झाल्यास त्वरित 1930 या राष्ट्रीय सायबर हेल्पलाईन नंबरवर तक्रार नोंदवा, असे आवाहन करण्यात आले आहे.












