रत्नागिरीत पुढील पाच दिवस मध्यम पावसाचा इशारा; शेतकऱ्यांना सतर्कतेचा सल्ला

रत्नागिरी :
रत्नागिरी जिल्ह्यात पुढील काही दिवस हवामानात बदल होण्याची शक्यता असून ३ ते ६ जूनदरम्यान मध्यम पाऊस, विजांच्या कडकडाटासह वादळी परिस्थिती आणि ताशी ४० ते ५० किमी वेगाने वारे वाहण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. त्यामुळे शेतकरी व पशुपालकांनी आवश्यक खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

हवामान विभागाच्या अंदाजानुसार जिल्ह्यात २ जून रोजी हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे, तर ३ ते ६ जूनदरम्यान अनेक ठिकाणी मध्यम पावसासह वादळी वातावरण राहू शकते. या कालावधीत कमाल तापमान ३२ ते ३६ अंश सेल्सिअस, तर किमान तापमान २५ ते २७ अंश सेल्सिअस दरम्यान राहण्याची शक्यता आहे.

संभाव्य वादळी वाऱ्यामुळे नव्याने लावलेली सुपारी, नारळ, आंबा व काजूची रोपे यांना आधार देण्याचा सल्ला देण्यात आला आहे. खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर भातशेतीतील बांध दुरुस्ती, स्वच्छता आणि तणनियंत्रणाची कामे तातडीने पूर्ण करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

भात रोपवाटिकेची तयारी करणाऱ्या शेतकऱ्यांनी योग्य निचऱ्याची व्यवस्था करून गादीवाफे तयार करावेत तसेच शिफारशीनुसार खतांचा वापर व बियाणे प्रक्रिया करावी, असे कृषी तज्ज्ञांनी सांगितले आहे. नागली, वरी, भुईमूग, कारळा तसेच वेलवर्गीय भाजीपाला लागवडीसाठीही पूर्वमशागतीबाबत मार्गदर्शन करण्यात आले आहे.

आंबा उत्पादकांना परिपक्व फळांची तातडीने काढणी करून सुरक्षित साठवण करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. तसेच काढणीनंतर बाग स्वच्छ ठेवून रोगग्रस्त फांद्या व गळलेली फळे नष्ट करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

पशुपालक आणि कुक्कुटपालकांनी उष्ण व दमट हवामान लक्षात घेऊन जनावरांना पुरेसे स्वच्छ व थंड पाणी उपलब्ध करून द्यावे. वादळी हवामानाच्या शक्यतेमुळे जनावरे व पक्षी झाडाखाली न ठेवता सुरक्षित गोठा किंवा शेडमध्ये ठेवण्याचा सल्ला देण्यात आला आहे.