▪️मालवण तालुक्यात सेंद्रिय शेतीची ‘त्रिसूत्री’ मोहीम
▪️गावागावांत होतायत बायोचार, गोकृपामृत आणि दशपर्णी अर्काची प्रात्यक्षिके
▪️तालुका कृषी कार्यालयाचा स्तुत्य पुढाकार
▪️ टाकाऊ कचरा आणि गोवंशाच्या आधारे शेतीचा खर्च ७० टक्क्यांनी घटणार

मसुरे | झुंजार पेडणेकर : सध्या रासायनिक खतांच्या भरमसाठ किमती आणि महागड्या कीटकनाशकांमुळे शेतीचा उत्पादन खर्च अवाढव्य वाढला आहे. यामुळे घटणारी नफ्याची टक्केवारी आणि जमिनीचा खालावणारा पोत यावर कायमस्वरूपी मात करण्यासाठी तालुका कृषी कार्यालय, मालवणच्या वतीने तालुक्यात एक विशेष मोहीम हाती घेण्यात आली आहे. मालवण तालुक्यातील गावागावांमध्ये सध्या बायोचार (सेंद्रिय कोळसा), गोकृपामृत आणि दशपर्णी अर्क बनवण्याची थेट शेतावर विस्तृत प्रात्यक्षिके घेतली जात आहेत. शेतीचा खर्च ‘शून्या’वर आणून शाश्वत आणि विषमुक्त भरघोस उत्पन्न मिळवून देणाऱ्या या त्रिसूत्रीला तालुक्यातील शेतकऱ्यांकडून प्रतिसाद मिळत आहे.शेतकरी मित्रानो,शेतीचे अर्थकारण बदलून टाकणाऱ्या या तीनही सेंद्रिय घटकांची सविस्तर निर्मिती पद्धत, साहित्य आणि त्यांचे शेतीला होणारे फायदे चला तर मग जाणून घेऊया…..!
▪️ बायोचार : जमिनीची सुपीकता टिकवणारे ‘बँक लॉकर’
शेतातील टाकाऊ कचऱ्यापासून ‘पायरोलिसिस’ (ऑक्सिजन विरहित किंवा अत्यंत कमी ऑक्सिजनमधील ज्वलन) तंत्रज्ञानाचा वापर करून बायोचार बनवला जात आहे.
▪️बनवण्याची सोपी पद्धत-
शेतातील सुका कचरा (नारळाच्या शेंड्या, काथ्या, झाडांच्या सुकलेल्या फांद्या, लाकडाचा भुसा, पराटी किंवा पिकांची धसकटे) आणि २०० लिटरचा लोखंडी ड्रम किंवा शेतात घेतलेला शंकूच्या आकाराचा खड्डा.
▪️निर्मिती कृती: लोखंडी ड्रमच्या तळाशी आणि वरच्या बाजूला हवा जाण्यासाठी लहान छिद्रे पाडावीत. त्यात शेतातील सुका कचरा घट्ट दाबून भरावा आणि वरच्या बाजूने पेटवून द्यावा. जेव्हा कचरा चांगला पेट घेईल, धूर पूर्णपणे कमी होईल आणि निळी ज्योत दिसेल, तेव्हा ड्रमचे वरचे तोंड व छिद्रे मातीने किंवा ओल्या गोणपाटाने पूर्णपणे हवाबंद करावीत. ऑक्सिजन न मिळाल्याने आतमध्ये कचऱ्याची राख न होता कडक काळा कोळसा (बायोचार) तयार होतो. काही तासांनी त्यावर पाणी मारून तो थंड करावा.
▪️चार्जिंग पद्धत (सक्रिय करणे): हा बायोचार थेट जमिनीत न टाकता, तो बारीक करून शेणखत, गोमूत्र, ताक किंवा जीवामृताच्या द्रावणात १० ते १५ दिवस भिजवून ठेवावा. यामुळे त्यात उपकारक जीवाणूंची पैदास होते.
शेतीवरील खर्च कमी होऊन उत्पन्न वाढवणारे
▪️बायोचारचे फायदे:
पाण्याची ६०% पर्यंत बचत: बायोचार हा स्पंजसारखा सच्छिद्र असतो. मालवणच्या किनारपट्टीवरील हलक्या आणि वाळूयुक्त जमिनीत हा ओलावा दीर्घकाळ टिकवून ठेवतो, ज्यामुळे पिकांना पाणी देण्याची वारंवारता कमी होते.रासायनिक खतांचा खर्च वाचतो: जमिनीत टाकलेली खते वाहून न जाता किंवा हवेत उडून न जाता बायोचारच्या छिद्रात साठून राहतात व पिकाला गरजेनुसार मिळतात. यामुळे रासायनिक खतांचा खर्च ३०% ते ४०% कमी होतो.
▪️ गोकृपामृत: माती सजीव करणारे विरजण असून जमिनीचा कस सुधारण्यासाठी आणि मातीतील सुप्त जीवाणूंना कार्यप्रवण करण्यासाठी गोकृपामृत हे शेतकऱ्यांसाठी वरदान ठरत आहे.
▪️लागणारे साहित्य (२०० लिटरसाठी):
गोकृपामृत बॅक्टेरिया (मदर कल्चर) – १ लिटर
देशी गाईचे ताजे शेण – ३ किलो
देशी गाईचे गोमूत्र – २ लिटर,काळा गूळ – २ किलो,२०० लिटरचा प्लास्टिक ड्रम आणि पाणी.
▪️बनवण्याची पद्धत:
प्लास्टिक ड्रममध्ये पाणी भरून त्यात २ किलो गूळ, २ लिटर गोमूत्र आणि ३ किलो ताजे शेण टाकून व्यवस्थित विरघळवून घ्यावे. त्यानंतर त्यात १ लिटर गोकृपामृत बॅक्टेरिया कल्चर सस्पेंशन मिळवावे. हे मिश्रण रोज सकाळ-संध्याकाळ काठीने घड्याळाच्या काट्याच्या दिशेने (Clockwise) २ मिनिटे फिरवावे. सावलीत ठेवलेल्या या ड्रममध्ये अवघ्या ५ ते ७ दिवसांत आंबट-गोड सुवासाचे उत्तम गोकृपामृत तयार होते.
▪️उपयोग आणि फायदे: गोकृपामृतामुळे जमिनीतील अन्नद्रव्ये विरघळवून देणाऱ्या जीवाणूंची संख्या अब्जावधींनी वाढते. परिणामी माती मऊ होऊन पिकांच्या मुळांची वाढ वेगाने होते.हे द्रावण पाणी देताना पाटाच्या पाण्यातून किंवा ड्रीपद्वारे थेट जमिनीला प्रति एकरी २०० लिटर या प्रमाणात द्यावे. तसेच पिकांवर १०% तीव्रतेने (९ लिटर पाण्यात १ लिटर गोकृपामृत) फवारणी केल्यास पिकांची वाढ जोमदार होते आणि बाजारातील महागड्या टॉनिकचा खर्च शून्यावर येतो.
▪️ दशपर्णी अर्क: किडींचा समूळ नायनाट करणारे अस्त्र
रासायनिक कीटकनाशकांना पूर्णपणे फाटा देऊन पिकांचे संरक्षण करण्यासाठी ‘दशपर्णी अर्क’ हे सर्वात प्रभावी आणि स्वस्त जैविक साधन आहे.
▪️लागणारे साहित्य:
१० प्रकारच्या कडू व जनावरे न खाणाऱ्या वनस्पतींची पाने (प्रत्येकी २ किलो): कडू निंब, करंज, कन्हेर, एरंड, घाणेरी (टणटणी), धूतरा, गुळवेल, पपई, रुई आणि सीताफळ किंवा आंबा.
देशी गाईचे ताजे शेण – ५ किलो
देशी गाईचे गोमूत्र – १० लिटर
पाणी – १५० लिटर आणि २०० लिटरचा प्लास्टिक ड्रम.
बनवण्याची पद्धत:
ड्रममध्ये १५० लिटर पाणी घेऊन त्यात ५ किलो शेण आणि १० लिटर गोमूत्र व्यवस्थित मिसळावे. त्यानंतर वरील सर्व १० प्रकारच्या वनस्पतींची पाने बारीक कुस्करून किंवा तुकडे करून त्या ड्रममध्ये टाकावीत. ड्रमचे तोंड गोणपाटाने किंवा सुती कापडाने घट्ट बांधून महिनाभर (३० दिवस) हे मिश्रण सावलीत ठेवावे. रोज सकाळी व संध्याकाळी हे मिश्रण काठीने डावीकडून उजवीकडे फिरवावे. ३० दिवसांनंतर कापडाने गाळून तयार झालेला अर्क बाटल्यांमध्ये भरून ठेवावा. हा अर्क ६ महिन्यांपर्यंत शेतकरी वापरू शकतात.
▪️उपयोग आणि फायदे:
हा अर्क प्रचंड कडू आणि उग्र वासाचा असल्याने मावा, तुडतुडे, पांढरी माशी, फुलकिडे आणि फळ पोखरणारी अळी यांसारख्या सर्व शोषक व हानिकारक किडींचा समूळ प्रादुर्भाव रोखतो.
फवारणी खर्चात १००% बचत होते.बाजारातील महागड्या रासायनिक औषधांवर होणारा हजारो रुपयांचा खर्च वाचतो. तसेच यामुळे निसर्गातील मित्र किडींचे (मधमाश्या व गांडूळ) रक्षण होते.
▪️वापर कसा करावा: साधारणपणे १०० लिटर पाण्यात २ ते २.५ लिटर दशपर्णी अर्क मिसळून पिकांवर सुरुवातीपासून दर १५ दिवसांच्या अंतराने फवारणी करावी.
▪️खर्च घटणार, उत्पन्न वाढणार – कृषी विभागाचा विश्वास-
“सध्याच्या काळात शेती फायदेशीर करायची असेल, तर बाजारातून विकत आणायच्या निविष्ठा बंद केल्या पाहिजेत. बायोचार, गोकृपामृत आणि दशपर्णी अर्क हे तिन्ही घटक शेतातील टाकाऊ कचरा आणि गोवंशाच्या आधारे शून्य खर्चात घरच्या घरी तयार होतात. यांच्या वापरामुळे खते आणि औषधांचा खर्च ६० ते ७० टक्क्यांनी कमी होतो, जमिनीची पाणी धरून ठेवण्याची क्षमता सुधारते आणि पिकाचे उत्पादन किमान २५ ते ३० टक्क्यांनी वाढते. मालवण तालुक्यातील प्रत्येक शेतकऱ्याने हे तंत्रज्ञान आत्मसात करावे, यासाठी कृषी विभाग गावागावांत पोहोचत आहे असे
तालुका कृषी अधिकारी, मालवण कार्यालय यानी सांगितले आहे.
मालवण तालुक्यातील या अभिनव प्रात्यक्षिकांमुळे गावोगावच्या शेतकऱ्यांमध्ये एक नवा उत्साह संचारला असून, तालुका आता पूर्णपणे स्वावलंबी आणि विषमुक्त सेंद्रिय शेतीकडे पाऊल टाकत असल्याचे चित्र दिसत आहे.













